लॉस्ट ॲन्ड फाउंडची पोलीस आयुक्तांनी घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:16 AM2021-02-06T04:16:49+5:302021-02-06T04:16:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गणेश विसर्जन मिरवणूक तसेच नव वर्षाचे स्वागत तसेच गर्दीच्या ठिकाणी शहरात मोठ्या प्रमाणावर मोबाइल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गणेश विसर्जन मिरवणूक तसेच नव वर्षाचे स्वागत तसेच गर्दीच्या ठिकाणी शहरात मोठ्या प्रमाणावर मोबाइल व पाकीटमारीच्या घटना घडतात. पण, त्याची दखल घेतली जातेच असे नाही. वस्तू चोरीला गेल्या तरी गहाळ किंवा हरवल्याची तक्रार नोंदविण्याची पुणे पोलिसांनी त्यांच्या वेबसाइटवर लॉस्ट ॲन्ड फाउंड या साइटवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यातून कागदपत्रे, मोबाइल हरविल्यास त्याचा उपयोग नवीन हँडसेट घेताना तोच क्रमांक मिळविण्यासाठी तसेच डुप्लिकेट कागदपत्रे मिळविण्यासाठी होतो. आपले काम होतय म्हणून फिर्यादी तक्रार दाखल करण्याचा आग्रह धरत नाही आणि पोलीसही अशा वस्तूच्या शोधासाठी प्रयत्न करताना दिसत नाही.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी लॉस्ट ॲन्ड फाउंड या पोर्टलवरील तक्रारींचा आढावा घेतला. त्यात लॉकडाऊन नुकताच संपला असताना जून २०२० मध्ये एका महिन्यात तब्बल ९१० मोबाइल गहाळ झाल्याची माहिती उपलब्ध होती. त्याचा शाेध घेण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिले. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विभागाने विश्लेषण करुन माहिती मिळवली. त्यात परिमंडळ १ कडून ५, परिमंडळ २ कडून ५, परिमंडळ ३ कडून ४, परिमंडळ ४ कडून ८ आणि परिमंडळ ५ कडून २० असे एकूण ३५ मोबाइल हस्तगत करण्यात आले आहे. हे मोबाइल मूळ मालकांना परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
........
जर एखाद्याने तुम्हाला मारहाण करून अथवा जबरदस्तीने २ हजार रुपयांचा मोबाइल चोरला. अथवा जबरदस्तीने तुमच्या खिशातून ५०० रुपये काढून घेतले तर पोलीस गुन्हा दाखल करतात. पण जर तुमचा महागडा ३० ते ४० हजार रुपयांचा मोबाइल तुमच्या नकळत कोणी चोरून नेला तर त्याचा गुन्हा दाखल न करता लॉस्ट ॲन्ड फाउंडवर तक्रार नोंदविण्यास सांगितले जाते. आजवर या लॉस्ट ॲन्ड फाउंडची दखल वरिष्ठ पोलीस अधिका-यां नी घेतली नव्हती. त्यामुळे शहरात अशा किती चो-या होतात, याची फक्त नोंद होत होती. त्याचा ना गुन्हा दाखल होत होता, ना शोध.