अवघ्या चार तासांत हरवलेला तीन वर्षाचा मुलगा पालकांच्या स्वाधीन; ऑपरेशन मुस्कानमुळे लागला तत्काळ शोध
By नितीश गोवंडे | Published: December 3, 2024 08:50 AM2024-12-03T08:50:54+5:302024-12-03T08:54:08+5:30
मुलाच्या आईने पोलिसांची व मुलाला पोलिसांकडे घेऊन गेलेल्या महिलेचे आभार मानले.
पुणे : वाघोली येथील बाईफ रोड येथील एका दुकानाजवळ सापडलेला तीन वर्षांचा मुलगा एका महिलेमुळे व पोलिसांच्या ऑपरेशन मुस्कानमुळे चार तासांत त्याच्या पालकांकडे पोहोचला. यावेळी मुलाच्या आईने पोलिसांची व मुलाला पोलिसांकडे घेऊन गेलेल्या महिलेचे आभार मानले.
युनिट ६ चे अंमलदार प्रतीक्षा पानसरे, सचिन पवार हे हद्दीत गस्त घालत असताना वाघोली येथील बाईफ रोडवरील निखार लेडीज शॉपजवळ मनीषा चेतन सोनार हिने त्यांना एक लहान मुलगा सापडला असे सांगितले. त्यानंतर दोघेही अंमलदार त्याला युनिट ६ च्या कार्यालयात घेऊन गेले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहिद पठाण यांना याबाबत कळविले असता त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पथकाच्या वेगवेगळ्या टीम बनवून मुलाच्या घरच्यांचा शोध घेण्यास सांगितले. तसेच सर्व प्रसार माध्यमांवरही मुलाचा वर्णनासह फोटो प्रसिद्ध केला.
यावेळी त्यांना डोमखेर रोड, बाईफ रोड, दत्तविहार या परिसरातील सोसायट्या, लेबर कॅम्प येथे पोलिस अंमलदारांनी शोध घेतला असता त्यांना अक्षय संस्कृती सोसायटीतील एक महिला मुलाचा शोध घेत असल्याचे समजले. त्या महिलेला मुलाचा फोटो दाखविला असता तिने तो मुलगा तिचाच असल्याचे सांगितले. मुलाचा शोध लागल्याने तिच्या डोळ्यांतील आश्रू थांबत नव्हते.
मुलाला भेटण्यासाठी ती कासावीस झाली होती. यावेळी पोलिसांनी तत्काळ मुलाला आईच्या हवाली केले. यावेळी मुलाची आई मनीषा चेतन सोनार यांनी सतर्क पुणे पोलिसांचे आभार मानले. अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ६ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे, पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, अंमलदार रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, सुहात तांबेकर, कानिफनाथ कारखेले आणि कीर्ती मांदळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.