पत्नीला कार शिकवताना सुटला ताबा; कारसह पती - पत्नी विहिरीत, पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 03:19 PM2021-12-14T15:19:20+5:302021-12-14T15:19:35+5:30
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील केंदूर रस्त्याने पती कार घेऊन पत्नीला शिकविण्यासाठी गेला होता
केंदूर : शिरूर तालुक्यातील करंदी येथे आज पहाटेच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली आहे. पती आपल्या पत्नीला कार शिकवत असताना पत्नीचा ताबा सुटल्याने कार विहिरीत पडून पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वर्षा दिपक आदक (वय ३० वर्षे रा. शेखर हाईटस सोसायटी, ता. शिरुर) असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दिपक प्रभाकर आदक (वय ३६ वर्षे रा. शेखर हाईटस सोसायटी ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील केंदूर रस्त्याने दिपक आदक हा कार घेऊन पत्नी वर्षा हिला कार शिकविण्यासाठी गेला होता. करंदी गावातील पऱ्हाडवाडी रोडने पत्नी वर्षा हिला दिपक कार शिकवत असताना समोरून अचानक दुचाकी आली. यावेळी दिपक याने वर्षा हिला कारचा ब्रेक दाबल्याचा सांगितल्यावर चुकून वर्षाने कारच्या एक्सलेटरवर पाय दिला. त्यावेळी कारचा ताबा सुटल्याने कार शेजारील विहिरीमध्ये कोसळली. दिपकने तातडीने वर्षाच्या बाजूच्या काचेतून तिला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र वर्षाला बाहेर निघता आले नाही. त्यामुळे दिपकने स्वतः बाहेर बाहेर निघून पत्नीला देखील ओढून बाहेर काढले. आणि विहिरीतील पाईपला पकडून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. शेजारी रस्त्याने जाणारे काही नागरिक या ठिकाणी धावून आले. त्यांनी दिपक आदक व वर्षा आदक या दोघांना बाहेर काढले, मात्र विहिरीतून बाहेर काढल्यानंतर वर्षा हिची कसलीही हालचाल होत नव्हती. या घटनेमध्ये वर्षा दिपक आदक या महिलेचा जागीच मृत्यु झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल ढेकणे, पोलीस हवालदार संदीप कारंडे, पोलीस नाईक विकास पाटील, राहुल वाघमोडे यांनी घटना स्थळी धाव घेत पाहणी केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप कारंडे व विकास पाटील हे करत आहे.