हिंजवडीमध्ये धावत्या 'पीएमपीएमएल' बसमधून धुराचे लोट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 03:55 PM2019-10-26T15:55:50+5:302019-10-26T15:56:38+5:30
हिंजवडी आयटीपार्कमधील फेज तीन हद्दीत धावत्या प्रवासी पीएमपीएमएल बसमधून अचानक धूराचे लोट निघू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
पुणे : हिंजवडी आयटीपार्कमधील फेज तीन हद्दीत धावत्या प्रवासी पीएमपीएमएल बसमधून अचानक धूराचे लोट निघू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना आज सकाळी कराच्या सुमारास हिंजवडी माण आयटीपार्क मधील फेज तीनच्या हद्दीत मेगापोलीस सोसायटी जवळ घडली. निगडी ते हिंजवडी माण फेज तीन मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये ही दुर्घटना घडली. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास प्रवासी घेऊन निगडीकडे निघालेली पीएमपीएमएल बस अवघी एक स्टॉप पुढे गेली असता वाहनचालकाच्या केबीन मधून धुर येऊ लागला. चालकाने प्रसंगावधान दाखवत बस तत्काळ रस्त्याच्या बाजूला उभी करून प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले. अवघ्या काही मिनीटातच बसमधून मोठ्या प्रमाणात धुराचे प्रचंड लोट निघू लागल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवली.
इंजिनमधील बाहेरील बाजूस ऑईल अथवा डिजेल सांडल्याने तसेच इंजिन जास्त प्रमाणात गरम झाल्याने मोठ्या प्रमाणात धुर निघाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र आयटीपार्क हद्दीत प्रवासी पीएमपीएमएल बसला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने बस मधून प्रवास करताना आयटीयन्स तसेच स्थानिक ग्रामस्थांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.