रसिकांनी लुटला गीतांचा आनंद
By admin | Published: April 25, 2016 02:47 AM2016-04-25T02:47:52+5:302016-04-25T02:47:52+5:30
शास्त्रीय संगीत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या सांगीतिक कार्यक्रमात डॉ. कल्याणी बोंद्रे यांनी एकाच रागाच्या माध्यमातून अनेक
पुणे : शास्त्रीय संगीत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या सांगीतिक कार्यक्रमात डॉ. कल्याणी बोंद्रे यांनी एकाच रागाच्या माध्यमातून अनेक भावरंग वेगवेगळ्या गायन प्रकारातून उलगडून दाखवले.
आतापर्यंत केलेल्या अनेक मैफलींच्या शृंखलेतला हा अजून एक अनोखा कार्यक्रम होता. बिहाग रागातील ‘नवनीत भावे’ ही मध्यलय झपतालातील बंदिश व त्याला जोडून द्रूत तीनतालातील सुप्रसिद्ध बंदिश ‘लट उलझी सुलझा जा बालमा’ यांच्या बहारदार सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त टाळ्यांनी दाद दिली. ‘मम आत्मा गमला’ हे नाट्यगीत गाऊन त्यांनी आपल्या अष्टपैलू गायकीची पावती दिली. भावरंग रागांचे या संकल्पनेनुसार त्यांनी ‘तेरे सूर और मेरे गीत’ यासारखी अजरामर सिनेगीते गाऊन कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढवत नेली.
शास्त्रीय संगीतातील बंदिश आणि तराण्याच्या गायनाबरोबरच नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावसंगीत व चित्रपट संगीतातील काही रागांवर आधारित आकर्षक गीते यांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली. याचप्रकारे बागेश्री व खमाज हे राग व त्यांचे भावरंग डॉ. कल्याणी यांनी वेगवेगळ्या रचनांमधून सादर केले. यामध्ये बागेश्रीतील अतिद्रुत लयीतील तीनतालात सादर केलेला तराणा रसिकांचा विशेष आवडीचा ठरला व खमाजमधील प्रसिद्ध गुजराथी भजन ‘वैष्णव जन तो’ हे उत्स्फूर्त दाद मिळवून गेले. मैफलीची सांगता भैरवी भजनाने झाली.
उपेंद्र सहस्रबुद्धे (हार्मोनियम), अमित जोशी, (तबला), वसंत देव (तालवाद्य), गीतांजली हराळ (तानपुरा) यांनी साथसंगत केली.