दीड महिना पुरेल इतकाच साठा
By admin | Published: April 9, 2016 01:47 AM2016-04-09T01:47:04+5:302016-04-09T01:47:04+5:30
पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ तालुक्यातील काही भागास पाणीपुरवठा होणाऱ्या पवना धरणात ७ एप्रिलपर्यंत ३३ टक्के पाणीसाठा आहे. धरण बांधल्यानंतरच्या ४५ वर्षांत एप्रिलमधील हा नीचांकी साठा आहे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ तालुक्यातील काही भागास पाणीपुरवठा होणाऱ्या पवना धरणात ७ एप्रिलपर्यंत ३३ टक्के पाणीसाठा आहे. धरण बांधल्यानंतरच्या ४५ वर्षांत एप्रिलमधील हा नीचांकी साठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी १६ टक्के कमी साठा असून, तो जेमतेम दीड महिनाभर पुरेल इतका आहे.जपून पाणी वापरल्यास दोन महिन्यांचे नियोजन व्यवस्थित होईल अन्यथा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाणीकपात करावी लागण्याची शक्यता आहे. या वर्षी पाऊस कमी पडल्याने पवना धरण १०० टक्के भरलेच नाही. सध्या असलेला ३३ टक्के पाणीसाठा ४०-४५ दिवस पुरेल. त्यामुळे पुरवठ्यात कपात करण्याशिवाय पर्याय नाही. काटकसरीने वापर केल्यास पावसाळ्यापूर्वीचे दोन महिने पाणी पुरेल. गतवर्षी ७ एप्रिलअखेर धरणात ४९ टक्के साठा होता. या वर्षी मेपासून पिंपरी-चिंचवड शहरासह मावळला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे अपेक्षित आगमन न झाल्यास या भागात पाण्याबाबतची बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे. पवना पाटबंधारे विभागाचे अधिकारी मनोहर खाडे म्हणाले, ‘‘सध्या धरणातून १२०० क्युसेसने साडेपाच तास पाण्याचा विसर्ग केला जात आहे. आणखी पाणीकपात केली जाणार असून, मेमध्ये शेतीच्या पंपांचा पाणीपुरवठा बंद करून केवळ पिण्यासाठी पाणी दिले जाणार आहे. या वर्षी गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्के साठा कमी होता. आतापर्यंत १० टक्के पाणीकपात केली आहे. सर्वांनी आजपासूनच काटकसरीने पाण्याचा वापर करायला हवा.’’