‘भरपूर कामे, उत्तरे द्यायला मोकळा नाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:11 AM2021-09-22T04:11:41+5:302021-09-22T04:11:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘कोणी काहीपण बोलत बसेल, मला त्यावर बोलायला वेळ नाही, भरपूर कामे आहेत मला,’ असे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘कोणी काहीपण बोलत बसेल, मला त्यावर बोलायला वेळ नाही, भरपूर कामे आहेत मला,’ असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (दि. २१) सकाळी पत्रकारांशी बोलणे टाळले. गाडीत बसून ते लगेच मुंबईकडे रवानाही झाले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय)ची कार्यकारिणी बैठक सकाळी झाली. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सदस्य अजित पवार, दिलीप वळसे, जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
बैठकीनंतर शरद पवार लगेचच निघून गेले. अजित पवार पत्रकारांशी बोलतील असे अपेक्षित होते; मात्र आज बोलायचेच नाही असे ठरवून आल्याप्रमाणे पवार यांनी ठामपणे काहीही बोलायला नकार दिला. इमारतीच्या आवारात बराच वेळ ते कोणाबरोबर तरी मोबाइलवर बोलत थांबले होते. पत्रकारांनी त्यांना बोलण्याबाबत विचारणा केल्यावर, ‘कोणीही काहीही बोलत बसतील, त्यांच्या बोलण्यावर बोलायला मला मोकळा वेळ नाही, भरपूर कामे आहेत’ असे ते म्हणाले. पत्रकारांनी किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील, अनंत गिते यांची नावे घेतली. त्यावर ते म्हणाले, ‘मला काय करायचे कोण काय बोलले त्याचे? मी भला, माझे काम भले, मला काही तेवढाच धंदा नाही.’
जयंत पाटील बोलण्यास तयार झाले मात्र पवार यांनी त्यांना, ‘चला जयंतराव माझ्याबरोबरच,’ म्हणत स्वतःच्या गाडीत बसण्यासाठी बोलावले. ते बसल्यावर लगेच गाडी पुढे घेण्यास सांगत पवार निघूनही गेले. दिलीप वळसे हेही ‘दादा नाही बोलले, मी काय म्हणणार,’ असे म्हणत निघून गेले. अजित पवारांच्या नकारामुळे सर्वच मंत्री न बोलता निघून गेले. नंतर आलेल्या आमदार रोहित पवार यांनीही ‘अजितदादा नाही बोलले, मी काय बोलणार, मला तर विषयही माहिती नाही,’ असे म्हणत निघून जाणे पसंत केले.