पुण्यात म्हाडाच्या साडे तीन हजार घरांसाठी लवकरच सोडत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 12:17 PM2020-09-21T12:17:30+5:302020-09-21T12:18:00+5:30
लाभार्थ्यांना शासनाच्या स्टॅम्प ड्युटी माफीचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न
पुणे : पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या ( म्हाडा) वतीने पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल साडे तीन हजार घरांसाठी लवकरच सोडत जाहिर करण्यात येणार आहे. राज्य शासनाने डिसेंबर 2020 अखेर पर्यंत स्टॅम्प ड्युटी मध्ये सवलत जाहिर केली असून, म्हाडाच्या लाभार्थ्यांना या सवलतीचा लाभ मिळावा यासाठी तातडीने सोडत जाहीर करण्यात येणार असल्याचे पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितले.
राज्यासह पुणे जिल्ह्यात कोरोना महामारी आणि लाॅकडाऊन मुळे गेली तीन-चार महिने बहुतेक सरकारी कार्यालये देखील केवळ नावालाच सुरू होती. यामध्ये अनेक सरकारी कार्यालयाचे कामकाज तर ठप्पच होते.पण आता ऑनलाॅक मध्ये बहुतेक सर्व व्यवहार सुरुळती होत असून , शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत.
याबाबत माने यांनी सांगितले,पुण्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात म्हाडाच्या घरांसाठी जाहिरात काढण्यात येणार आहे. खासगी विकासकाकडून म्हाडाला २० टक्के जी घरे मिळाली आहेत. त्या घरांची किंमत निश्चित करण्याचे काम सुरू आहे. तसेच म्हाडाच्या स्वत : च्या जागेवर देखील मोठ्या प्रमाणात या वेळी घरे बांधण्यात येणार आहे.
त्यामुळे काम पूर्ण होताच ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याबाबत माने पाटील यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे लोकांची आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे. यामुळेच म्हाडाच्या वतीने लोकांना परवडणाऱ्या किंमतीत घरे उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यात लाभार्थांना स्टॅम्प ड्युटीचा लाभ मिळाल्यास आणखी एक दीड लाख रुपयांचा फायदा होऊ शकतोय. यासाठी येत्या काही दिवसांत पुण्यात साडे तीन हजार घरांची सोडत करण्यात येणार आहे.