गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कमळ, केवडा, पत्रींची किंमत कडाडली; कोरोनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 08:13 PM2020-08-21T20:13:20+5:302020-08-21T20:36:06+5:30
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मंडई परिसरात नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती दरवर्षीच्या तुलनेत १०-२० टक्के मालाचीच आवक
पुणे : कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईचा मोठा फटका बसला आहे. पूजेसाठी लागणारी फुले, पत्री, दुर्वा असे सर्वच साहित्य दर वर्षीपेक्षा दुपटीने महाग झाले आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला कमळाचे एक फूल ५० रुपये, पत्री आणि दुर्वांची जुडी प्रत्येकी ५० रुपये, झेंडू, शेवंतीची फुले ८० रुपये पाव, केवडा पान ४० रुपये या दराने पूजेच्या साहित्याची विक्री झाली. लॉकडाऊनमुळे दर वर्षीच्या तुलनेत १०-२० टक्के मालाचीच आवक झाल्याचे फुलविक्रेत्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मंडई परिसरात नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. केळीचे खुंट, पत्री, दुर्वा, झेंडूची फुले, शेवंतीची फुले, कमळ, केवडा या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. यंदाचे पूजेच्या साहित्याचे दर पाहून अनेकांनी आश्चर्य तर काही जणांनी नाराजीही व्यक्त केली. मर्यादित साहित्य आणि चढा दर असे चित्र मंडई परिसरात पहायला मिळाले. दर वर्षी पत्री, दुर्वा १०-२० रुपयांना मिळतात, तर कमळ २०-२५ रुपयांपर्यंत मिळते. यंदाच्या किमती मात्र शब्दश: गगनाला भिडल्या आहेत.
फुलविक्रेत्या पूजा शिर्के म्हणाल्या, ‘गेले पाच महिने लॉकडाऊन असल्याने, लोक घराबाहेर पडत नसल्याने आणि मंदिरे बंद असल्याने व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्यवसायात थोडी तेजी आली आहे. मात्र, सर्वच साहित्य यंदा आम्हीही मार्केट यार्डमधून चढ्या दराने खरेदी केले. फुलांचे दर ऐकून ग्राहक राग व्यक्त करत आहेत. मात्र, आमचाही इलाज नाही. गेल्या ४० वर्षांपासून आम्ही या व्यवसायात आहोत. एवढी महागाई आजवर कधीच पाहिली नव्हती.’
----------------------
फुले, पत्री, दुर्वा असे साहित्य घेऊन अनेक शेतकरी, फुलविक्रेते खेडेगावातून पुण्यात येतात. पत्री, दुर्वा असे साहित्य पानशेत, खडकवासला, मुळशी अशा जवळच्या ठिकाणांहून येते. कमळांची आवक मुंबईतून होते. केवडा लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, उदगीर अशा ठिकाणांहून येतो. लॉकडाऊनमुळे शेतकरी पुण्यार यायला घाबरत आहेत, त्यामुळे साहित्याची १०-२० टक्केच आवक झाली आहे. यंदा शेतकऱ्यांचे चार-पाच महिन्यांत मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची लागवड वाया गेली आहे, तर अनेकांनी व्यवसाय होणार नाही, या भीतीने लागवडच केलेली नाही. त्यामुळे यंदा महागाईने उच्चांक गाठला आहे.
- सुहास सरपाले, सरपाले फ्लॉवर मर्चंट