पंजाने थोपवली कमळाची लाट

By admin | Published: February 26, 2017 03:50 AM2017-02-26T03:50:21+5:302017-02-26T03:50:21+5:30

महापालिका निवडणुकीत भाजपाच्या कमळ चिन्हाच्या लाटेत अनेक जण वाहून गेले, मात्र काँग्रेसच्या काही दिग्गजांनी त्यातही आपली नौका बरोबर तीराला लावली.

The Lotus Lotus Thrust Stopped | पंजाने थोपवली कमळाची लाट

पंजाने थोपवली कमळाची लाट

Next

पुणे : महापालिका निवडणुकीत भाजपाच्या कमळ चिन्हाच्या लाटेत अनेक जण वाहून गेले, मात्र काँग्रेसच्या काही दिग्गजांनी त्यातही आपली नौका बरोबर तीराला लावली. पालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांच्या प्रभाग क्रमांक २० चा त्यात समावेश होतो. या प्रभागात त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी होती. शिंदे यांच्यासह काँग्रेसचे तिघे व राष्ट्रवादीही एक जागा म्हणजे आघाडीचे संपूर्ण पॅनलच विजयी झाली. शहरात इतरत्र काँग्रेस व राष्ट्रवादीची संपूर्ण पॅनल कोसळत असताना आघाडीने या प्रभागात यश मिळवले. प्रभागात काम, लोकसंपर्क असला की लाटही थोपवता येते याचे हे उदाहरण आहे.
अरविंद शिंदे, चाँदबी हाजी नदाफ व लता राजगुरू हे काँग्रेसचे व प्रदीप गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अशा चारही उमेदवारांना मतदारांनी पसंती दिली. चौघांमधील चाँदबी हाजी नदाफ वगळता उर्वरित तिघेही विद्यमान नगरसेवक आहेत. भाजपाने कल्पना बहिरट, विशाल शेवाळे यांच्याबरोबर जमाल शरीफ शेख व शबनम यासीन शेख असे उमदेवार देत मतांसाठी राजकीय चलाखी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा उपयोग झाला नाही. विजयी उमेदवारांच्या तुलनेत त्यांना फारशी मते मिळाली नाहीत. त्याऐवजी बहुजन समाज पक्षाच्या सूर्यकांत निकाळजे सुविधा त्रिभुवन, सुमन गायकवाड व सचिन शिंदे या उमेदवारांना लक्षणीय मते मिळाली. निकाळजे तर शिंदे यांच्यापेक्षा १ हजारपेक्षा जास्त मतांनी सुरुवातीच्या फेरीत आघाडीवर होते.
ड गटात शिंदे यांना १२ हजार ४६४ मते मिळाली. बसपाच्या निकाळजे यांना ७ हजार २५७ मते मिळाली, तर भाजपाच्या जमाल शरीफ शेख यांना फक्त ४ हजार ५४२ मते मिळाली. क गटात लता राजगुरू यांनी ९ हजार ७७७ मते मिळाली. त्या विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या जमाल शरीफ शेख यांना ६ हजार ३९९, तर बसपाच्या त्रिभुवन यांना ५००९ मते मिळाली. ब गटामध्ये काँग्रेसच्या चाँदबी हाजी नदाफ यांनी ११ हजार १६१ मते मिळवून विजयी झाल्या. बसपाच्या सुमन गायकवाड यांना ७ हजार ८०६ मते मिळाली. भाजपाची उमेदवारी करीत असलेल्या कल्पना बहिरट यांना ९ हजार ११४ मते मिळाली.
अ गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप गायकवाड ११ हजार ७१७ मते मिळवून विजयी झाले. भाजपाच्या विशाल शेवाळे यांना ६ हजार ७४७, तर बसपाच्या सचिन शिंदे यांना ६ हजार ७०७ मते मिळाली. बसपाच्या उमेदवारांना थोडा अधिक वेळ मिळाला असता तर त्यांनी आघाडीच्या उमदेवारासमोर आव्हान उभे केले असते, हेही स्पष्ट दिसते.

प्रभाग क्रमांक २० मध्ये आघाडीचे पॅनल
या भागातील रहिवासीही थोड्या सोसायट्यांचा अपवाद वगळता सर्वसाधारण, मध्यमवर्गीय, कष्टकरीच आहे. काँग्रेसचा पारंपरिक मतदार शहराच्या अन्य भागात थेट भाजपाकडे वळलेला असताना या भागात मात्र त्याने काँग्रेसलाच मतदान केल्याचे दिसते आहे. तसेच त्यांनी दुसरी पसंती भाजपाला न देता बसपाला दिल्याचेही निदर्शनास येते. काँग्रेस राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांना ते नगरसेवक असल्याचा फायदा झाला, मात्र अन्य प्रभागांमध्ये नगरसेवकही पराभूत होत असताना त्यांनी आपल्या जागा कायम ठेवल्या हे उल्लेखनीय आहे. याशिवाय आघाडीमुळे दोन्ही पक्षांना फायदा झाला.

- अन्य प्रभागांप्रमाणेच याही प्रभागात नोटाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. एकूण मतदान ३० हजार ६६६ झाले. त्यापैकी तब्बल ४ हजार ३८२ मते नोटाची आहेत. इतक्या मतदारांना एकही उमेदवार पसंत पडला नाही, असा याचा सरळ अर्थ आहे.

Web Title: The Lotus Lotus Thrust Stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.