शिरूर लोकसभा मतदारसंघात कमळ फुलणार- राज्यमंत्री रेणुका सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 01:41 PM2022-09-19T13:41:26+5:302022-09-19T14:08:41+5:30
या मतदारसंघाच्या विकासासाठी काम केले जाईल...
मंचर (पुणे) : शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलवायचे आहे. या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर येथे भाजपचा लोकप्रतिनिधी हवा. या मतदारसंघाच्या विकासासाठी काम केले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी केले.
लोकसभा प्रवास योजना माध्यमातून सिंह यांनी मंचर येथे पत्रकारांशी वार्तालाप केला. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार महेश लांडगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय थोरात, महामंत्री धर्मेंद्र खांडरे, आशा बुचके, अतुल देशमुख, भाजप सहसंपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, तालुकाप्रमुख डॉ. ताराचंद कराळे, विजय पवार, नवनाथ थोरात, प्रा. उत्तम राक्षे, गणेश थोरात, रूपाली घोलप, अर्चना बुट्टे, उर्मिला कांबळे, स्नेहल चासकर आदी उपस्थित होते.
सिंह म्हणाल्या, सबका साथ सबका विकास हे सूत्र घेऊन भाजपने मागील आठ वर्षांत देशातील छोट्या-मोठ्या समस्यांचे निराकारण केले आहे. देशातील १४४ ठिकाणी भाजपचे लोकसभा सदस्य नाहीत. त्यात शिरूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. जेथे भाजप नाही तेथे विकास होत नाही. या मतदारसंघात विकासाची संभावना आहे. त्यामुळे येथे भाजपचे कमळ फुलवायचे आहे.
भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय थोरात प्रस्ताविक करताना म्हणाले, या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार यापूर्वी निवडणूक लढला नाही. शिवसेना-भाजप एकत्रित निवडणूक लढवत होते. आता भाजपला संधी मिळणार असून, निश्चितच या भागात भाजप यश संपादन करेल. सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी केले.