प्रेम सात्त्विक मूल्य : वि. दा. पिंगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:15 AM2021-02-17T04:15:30+5:302021-02-17T04:15:30+5:30
पुणे : प्रेम हे समर्पणातूनच सिद्ध होते. संपूर्ण विश्व कवेत घेण्याचे सामर्थ्य प्रेम या भावनेत आहे. पण आज आंधळ्या ...
पुणे : प्रेम हे समर्पणातूनच सिद्ध होते. संपूर्ण विश्व कवेत घेण्याचे सामर्थ्य प्रेम या भावनेत आहे. पण आज आंधळ्या प्रेमाचा बाजार मांडलेला दिसत आहे. प्रेम हे एक सात्त्विक मूल्य असून, ते भोगावर नव्हे, तर त्यागावर उभे असते, असे प्रतिपादन ‘मसाप’चे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी केले.
प्रणाली प्रकाशनतर्फे प्रिया गोगावले-विखे लिखित ‘प्रीत बहरताना’ या कादंबरीचे प्रकाशन वि. दा. पिंगळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध ग्रामीण कथाकार बबन पोतदार तसेच सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर, मनपा शिक्षण विभागाचे अधिकारी जयेश शेंडकर, हुजूरपागा संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्य अरुणा भांबरे, पर्यवेक्षिका कात्रज विभाग उषा काळे, ह.भ.प. गणेश महाराज भगत, रँग्लर र. पु. परांजपे शाळेच्या मुख्याध्यापिका उन्नती जावडेकर, मनपा शाळेच्या मुख्याध्यापिका करुणा मापारे, प्रकाशक शामला पंडित-दीक्षित, उपस्थित होते.
पिंगळे म्हणाले, लेखिकेने विविध सामाजिक विषयांना वाचा फोडण्याचे काम केले असून, त्यात विधवा पुनर्विवाह, स्त्रियांची आजही होणारी सामाजिक कुचंबणा, प्रेमविवाह यांसारखे महत्त्वाचे विषय कादंबरीतून मांडलेले आहेत.
बबन पोतदार यांनी मिलिंद आणि सावीचे बालपणापासून असलेले प्रेम, त्यात आलेले विविध अनुभव सुंदररीत्या लेखिकेने मांडलेले आहेत. ग्रामीण भाग, भाषा याने समृद्ध अशी वाचकाला मंत्रमुग्ध करणारी ही कादंबरी असल्याचे सांगितले.
तसेच डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या पत्रातून लेखिकेस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पत्राचे वाचन कविता हडवळे यांनी केले. पूजा नळे यांनी सूत्रसंचालन केले .
-----------------------------------------