‘लिव्ह-इन’मधून ज्येष्ठ नागरिकांचे बहरतेय प्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:11 AM2021-02-14T04:11:59+5:302021-02-14T04:11:59+5:30

लक्ष्मण मोरे पुणे : तारुण्याच्या ऐन भरात विवाह झाल्यानंतर वार्धक्य येईपर्यंत माणूस संसार फुलवित राहतो. परंतु, आयुष्यभराचा जोडीदार मध्येच ...

The love of senior citizens from 'Live-in' | ‘लिव्ह-इन’मधून ज्येष्ठ नागरिकांचे बहरतेय प्रेम

‘लिव्ह-इन’मधून ज्येष्ठ नागरिकांचे बहरतेय प्रेम

Next

लक्ष्मण मोरे

पुणे : तारुण्याच्या ऐन भरात विवाह झाल्यानंतर वार्धक्य येईपर्यंत माणूस संसार फुलवित राहतो. परंतु, आयुष्यभराचा जोडीदार मध्येच साथ सोडून गेल्यानंतर कोलमडून पडायला होते. एकटेपणाची भावना जीवावर उठते. जेवणाखाण्यापासून ते औषधांपर्यंतचे हाल होऊ लागतात. अशा काळात पुन्हा सोबत चालणा-या पावलांची आवश्यकता भासू लागते. सप्तपदी न चालताही ‘लिव्ह-इन-रिलेशीप’मधून शेकडो ज्येष्ठांचे प्रेम पुन्हा बहरास आले आहे. एकमेकांना समजून घेत एकमेकांची काळजी घेत या जोडप्यांच्या आयुष्याची सांज पुन्हा सुरम्य झाली आहे.

लिव्ह इनकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन अद्यापही बदलेलेला नाही. ज्येष्ठांचे वयोमान साधारणपणे ८० ते ९० च्या दरम्यान आलेले आहे. त्यामुळे खूप मोठा काळ त्यांना एकट्याने कंठावा लागतो. त्यांनाही जोडीदाराची आवश्यकता असते.

सुख-दु:खात, संघर्षात, यशापशात साथ देणारा जोडीदार मध्यातूनच सोडून गेल्यामुळे आयुष्य खडतर होते. मुलांचे होणारे दुर्लक्ष आणि एकटेपणाची भावना या ज्येष्ठांना मानसिक यातना देत राहते. त्यांच्या या समस्येवर ‘लिव्ह इन’चा उतारा लागू पडला आहे.

कोणी डॉक्टर आहे तर, कोणी व्यावसायिक, कोणी प्राध्यापक आहे तर कोणी गृहीणी, कोणी राजकारणी आहे तर कोणी निवृत्त सरकारी अधिकारी. सामाजिकदृष्ट्या ते विवाहीत नसले तरी त्यांची अंतर्मने जुळलेली आहेत. एकमेकांच्या काळजातलं दु:ख, डोळ्यातली वेदना, दुखणं-खुपणं, आनंद त्यांना समजतो. एकाला वेदना झाली तर दुसरा कळवळतो एवढे उत्तम ‘बॉंडिंग’ या ज्येष्ठांमध्ये लिव्ह-इनमधून तयार झाले आहे.

===

सकारात्मक बाजू

- दोघांच्या राजीखुशीने करारनामा करणे

- काही काळ एकत्र व्यतित केल्यावर दोघांची इच्छा असल्यास लग्नही

- जो-तो आपापला आर्थिक भार उचलतो. संपत्तीला कोणताही धोका नाही. (त्यामुळे मुलांकडून सकारात्मक प्रतिसाद)

- जेवणाची व औषधांची पथ्ये पाळली जातात.

- योग्य जोडीदार मिळाल्यास दोघेही एकमेकांची काळजी घेतात.

- संवाद साधायला, मोकळं व्हायला हक्काचं माणूस मिळतं.

====

Web Title: The love of senior citizens from 'Live-in'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.