प्रेमीयुगलांनो टेकडीवर सायंकाळी बसणे धोक्याचे! चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा धाेका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 01:04 PM2022-10-05T13:04:17+5:302022-10-05T13:08:44+5:30
वन कर्मचाऱ्यांची कमतरता...
पुणे : शहरातील टेकडीवर तरुण-तरुणी सायंकाळी बराच वेळ थांबून रोमॅन्टिक गप्पा मारण्यात दंग होतात. निर्मनुष्य ठिकाणी, झाडा-झुडपात ते दिसणार नाहीत, असे बसतात. पण त्यामुळे चोरट्यांचे फावते. अशा जोडप्यांना चाकूचा धाक दाखवून लुटण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे सायंकाळनंतर टेकडीवर थांबूच नये, असे आवाहन वनविभाग आणि पोलिसांनी केलेले आहे. सायंकाळनंतर टेकडीवर काय काम असते, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
वेताळ टेकडीवर सोमवारी सायंकाळी एका तरुणाला धमकावून त्याच्यावर चाकूचे वार केले. त्यानंतर त्याच्याकडील ऐवज चोरून नेला. त्यामुळे टेकडीवर सायंकाळी उशिरापर्यंत थांबणे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेमुळे वनविभाग आणि पोलीस दोघांची डोकेदुखी वाढली आहे.
खबरदारी आवश्यक
- शहरात वेताळ टेकडी, हनुमान टेकडी, तळजाई, म्हातोबा टेकडी अशा अनेक टेकड्या आहेत. त्यावर सकाळ व सायंकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे सायंकाळी उशिरापर्यंत टेकडीवर थांबल्याने गुन्हेगारांचे फावत आहे. त्यांना आयते सावज मिळत असल्याने ते चाकूचा धाक दाखवून लुटतात. अशा अनेक घटना गेल्या काही महिन्यांमध्ये घडल्या आहेत.
- तळजाई टेकडीवर मंदिराकडे जाताना रस्त्याच्या कडेला अनेक जोडपी दुचाकीवर किंवा झाडाच्या अंधारात बसलेली असतात. या परिसरात सायंकाळनंतर पोलिसांची गस्त सुरू असते. परंतु, अनेक ठिकाणी सतत पोलिसांना जाता येत नाही किंवा तिथे थांबता येत नाही. परिणामी चोरटे त्याचा फायदा घेतात.
- वेताळ टेकडीवर खूप मोठा परिसर आहे. त्या ठिकाणी झाडाझुडपात तरुण-तरुणी गप्पा मारत बसतात. शहरातील उद्यानांमध्ये बसल्यावर काही बंधने येतात. त्यामुळे ही जोडपी टेकडीवर स्वत:ला सुरक्षित समजतात आणि बिनधास्त वागतात.
वनविभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे टेकडीवर सर्वत्र त्यांची नियुक्ती करता येत नाही. जोडप्यांनी किंवा नागरिकांनी सायंकाळनंतर टेकडीवर थांबू नये. खरंतर रात्री जंगलात जायचेच नसते. तरी आता आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने गस्त वाढवली आहे.
- प्रदीप संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग
वनविभागाने टेकडीवर ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावावेत. तसेच वनरक्षकांची संख्या वाढवायला हवी. कारण टेकडीचा परिसर खूप मोठा आहे. आमच्याकडे तो भाग येत नसला तरी आम्ही गस्त घालतो. टेकडीला कुंपण करावे.
- मुरलीधर करपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन पोलीस ठाणे