कानिफनाथ घाटात प्रेमीयुगलाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 06:31 PM2018-12-09T18:31:35+5:302018-12-09T18:33:12+5:30
कानिफनाथ घाटांत एका तरूणासह अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. दोघेही परप्रांतीय असून प्रेमप्रकरणातून सदर आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे.
लोणी काळभोर : होळकरवाडी ( ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील कानिफनाथ घाटात एका तरूणासह अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. दोघेही परप्रांतीय असून प्रेमप्रकरणातून सदर आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे.
अभिमन्यू अर्जुनदास ( वय १९) व इतिदास ( वय १५, दोघेही रा. नबाबनगर, कुपवाह, दक्षिण दिनाजपूर, पश्चिम बंगाल ) असे आत्महत्या केलेल्या तरुण - तरुणीचे नांव आहे. याप्रकरणी होळकरवाडीचे माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष कालीदास रामदास झांबरे ( वय ३३, रा. होळकरवाडी - कानिफनाथ रोड, ता. हवेली ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकार शनिवार ( ८ डिसेंबर ) रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. झांबरे हे घरी असताना त्यांना तेथील स्थानिक नागरिकांनी होळकरवाडी - कानिफनाथ घाटात असलेल्या चौथ्या वळणावर रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या एका झाडाच्या फांदीला ओढणी अडकवून एक मुलगा व एक मुलीने गळफास लावून आत्महत्या केली असल्याची माहिती दिली. ते घटनास्थळी तात्काळ पोहचले. त्यांनी ऊरूळी देवाची दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांना सदर माहिती दिली. पोलीस पथक पोहचले नंतर स्थानिक नागरिकांचे मदतीने दोन्ही मृतदेह खाली उतरवण्यात आले.
पोलीसांनी स्थानिकांकडे व तेथे जमलेल्या लोकांकडे चौकशी केली असता त्या दोघांना कोणीही ओळखत नव्हते. म्हणून पोलीसांनी दोघांची तपासणी केली असता त्यांना मयत मुलाच्या खिशामध्ये असलेल्या पाकिटात दोघांचेही आधारकार्ड सापडले. त्यावरून त्यांची ओळख पटली. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ससून रूग्णालय पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. यानंतर मुलाकडे मिळून आलेल्या मोबाईल वरून काही जनांशी संपर्क साधला असता पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दोघांच्याही घरची परिस्थिती हालाकीची असून ते कामानिमित्त या परिसरात आले होते. तर त्याचे एका मित्राने दोघेही एकमेकांवर प्रेम करत असल्याने अभिमन्यू हा इतिदास हिला घेऊन आला असल्याची माहिती पोलीसांना दिली आहे. त्यांचे कुटुंबीयांना सदर प्रकार कळवण्यात आला आहे. इतिदास हिचा एक भाऊ पुणे परिसरातील हॉटेल मध्ये काम करत असून त्याचेशी संपर्क साधून दोघांचे मृतदेह त्याचे ताब्यात देण्यात येणार आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर हे करत आहेत.