‘कमी कर्ब उत्सर्जन’ हेच आता विकासाचे मॉडेल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 12:23 PM2020-02-04T12:23:48+5:302020-02-04T12:29:29+5:30
सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे
पुणे : येत्या २०३० पर्यंत पुण्याला शून्य कर्बभार (कार्बन न्यूट्रल) बनवायचे असेल, तर कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करणे हाच एक उपाय आहे. त्यासाठी विकास करताना कमी कर्ब उत्सर्जन होईल, असे मॉडेल बनविणे, ग्रीन टाऊनशिप तयार करणे, लोकसंख्येवर नियंत्रण आणणे, ऊर्जा, पाणी, कचरा, वाहतूक या विषयांवर योग्य उपाय करणे आवश्यक आहे. या सर्व समस्यांवर एकत्रित काम केल्यास शून्य कर्बभार शक्य होणार आहे.
पुणे आणि परिसराचा विकास करताना ‘कार्बन न्यूट्रल डेव्हलपमेंट’ सक्तीने करावे लागणार आहे. त्यातूनच देशासाठी पुणे शून्य कर्बभार रोल मॉडेल होऊ शकेल. पुण्यात ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ स्मार्ट सिटीसाठी तयार केली आहे. त्याची अंमलबजावणी योग्यरीत्या केली तर खूप फायदा होऊ शकतो. नागरिकांनी कार्बन फूटप्रिंट (कर्ब पदचिन्हे) कमी करण्याचा ‘कूल कल्चर’ अंगिकारला तर तो अर्बन एरियासाठी दिशादर्शक ठरणारे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अनेक कामे होऊ शकतात. त्यामुळे वाहन बाहेर काढून होणारे कर्ब उत्सर्जन कमी होऊ शकते. त्यासाठी व्हीडिओ कॉन्फरन्सिंग, आॅनलाइन इनर्ट अॅक्शन्सचा वापर केल्यास कार्बन फूटप्रिंट कमी होईल. नवीन इमारतींमध्ये ई-व्हेईकल चार्जिंग करण्याची सुविधा दिल्यास इंधन जाळणारी वाहने कमी होतील. कृत्रिम कार्बन शोषून घेणारी झाडांची रचना टाऊनशिपमध्ये उभारता येईल, असे ‘पुणे शून्य कर्बभार २०३०’ या अहवालात नमूद आहे. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे डॉ. अमिताव मलिक, अदिती काळे यांच्यासोबतच अनेक संस्थांनी एकत्र येत हा अहवाल तयार केला आहे.
...............
शहरात अधिक कार्बन उत्सर्जन होत आहे. पण त्याचा फटका मात्र ग्रामीण भागातील लोकांना बसत आहे. कारण हवामानावर परिणाम झाला की, शेतकºयांना त्यात भरडावे लागते. जमिनीतील खनिज आपण खूप वापरतोय. खरंतर हवामानबदलावर उपाय करणारे दीर्घकालीन धोरण करायला हवे. हवेतील कार्बन कमी करून खनिजांचा वापरही कमी केला पाहिजे. सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे. - प्रियदर्शनी कर्वे, समुचित लया समूह
...........
काय केले पाहिजे ?
पर्यावरणीय कायदा पाळणे आवश्यक असून, बीडीपीमधील अतिक्रमण आणि प्रदूषण कमी करायला हवे. वृक्षतोड न करता ग्रीन कव्हर वाढविले पाहिजे. देशी झाडांवर भर हवा. पाणथळ, नदी, तलावांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याची सूचना अहवालात आहेत.
.........
सायकलचा वापर करा...
सायकल शेअरिंग योजना हा कर्ब उत्सर्जन कमी करण्याचा अत्यंत चांगला उपक्रम आहे. सायकल कुठेही मिळतात आणि कुठेही ठेवता येतात. तसेच ई-रिक्षा हा इको-फ्रेंडली पर्याय आहे. एलपीजी, डिझेलवर त्या उपलब्ध आहेत.
.......
पुण्यात वाहनांमधून होणारे कर्ब उत्सर्जन
वाहन प्रकार संख्या कर्ब उत्सर्जन
कार ५,३७,६१३ २२ टक्के
दुचाकी १७,५०,१७१ २१ टक्के
ट्रक, लॉरी ३३,४०८ १९ टक्के
स्कूटर ५,२३,६९८ ८ टक्के
डिलिव्हरी व्हॅन ४२,४६७ ७ टक्के
मोपेड १,९५,६९१ ३ टक्के
कॅब्स २१,१५८ ३ टक्के
डिलिव्हरी व्हॅन ३१,९२० ३ टक्के
(तीनचाकी)
..............