थंडीअभावी साखर उतारा घटला
By admin | Published: November 15, 2015 12:50 AM2015-11-15T00:50:08+5:302015-11-15T00:50:08+5:30
ऊसतोडणी वाहतूकदार संघटनांच्या संपानंतर आता जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी जोमाने धडधडू लागली आहेत.
सोमेश्वरनगर : ऊसतोडणी वाहतूकदार संघटनांच्या संपानंतर आता जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी जोमाने धडधडू लागली आहेत. जिल्ह्यातील १३ कारखान्यांनी मिळून ६ लाख ५९ हजार ३०१ टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. ६ लाख ४ हजार १५५ पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. मात्र, थंडीचे प्रमाण पुरेसे नसल्याने साखर उतारा अजून नऊ टक्क्यांवरच घुटमळत आहे. भीमा पाटस कारखाना दोन दिवसांपूर्वी सुरू झाला आहे. राजगड कारखान्याचे धुराडे अजून बंदच आहे.
या वर्षी साखर कारखान्यांचे हंगाम सुरू होण्याआधीच कारखान्यांपुढे अनेक विघ्ने उभी होती. ऊसतोडणी वाहतूकदार संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यामुळे कारखाने सुरू होण्यासाठी १० नोव्हेंबर उजाडला. या वर्षी उसाचे जादा क्षेत्र व दुष्काळाची भीषणता या पार्श्वभूमीवर ऊस गाळप लवकर संपविणे साखर कारखान्यांपुढे एक आव्हान आहे. १५ कारखान्यांपैकी भीमा पाटस व राजगड कारखाने वगळता उर्वरित १३ कारखान्यांमध्ये गाळपाच्या व साखर उत्पादनाच्याबाबतीत सहकारी साखर कारखान्यांच्या पुढे खासगी कारखाने गेले आहेत. बारामती अॅग्रो कारखाना ९८ हजार ४९० टन उसाचे गाळप करून १ लाख १ हजार ९५० पोत्यांचे उत्पादन घेत पहिल्या स्थानावर आहे. ८८ हजार टन उसाचे गाळप करून ८६ हजार पोत्यांचे उत्पादन घेत दौंड शुगर दुसऱ्या स्थानावर आहे. ७२ हजार ९६० टन उसाचे गाळप करून ६२ हजार ७०० पोत्यांचे उत्पादन घेत विघ्नहर तिसऱ्या स्थानावर आहे. ऊस गाळपाबरोबरच साखर उताऱ्यामध्ये खाजगी कारखान्यांनी बाजी मारली आहे. त्यात बारामती अॅग्रो पहिल्या क्रमांकावर आहे. (प्रतिनिधी)