उतारवयात छळतेय साेडियमची कमतरता! साठीनंतर कमी हाेताेय साेडियम

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: July 22, 2024 05:33 PM2024-07-22T17:33:39+5:302024-07-22T17:41:56+5:30

जवळपास ७० टक्के नागरिकांमध्ये सोडियमचे प्रमाण कमी हाेताना दिसत असल्याचे डाॅक्टरांचे निरीक्षण

low in sodium body after 60 years of age many cases in hospital | उतारवयात छळतेय साेडियमची कमतरता! साठीनंतर कमी हाेताेय साेडियम

उतारवयात छळतेय साेडियमची कमतरता! साठीनंतर कमी हाेताेय साेडियम

पुणे: एका ८० वर्षीय ज्येष्ठाला अचानक चक्कर येऊ लागली. अस्वस्थता जाणवू लागल्याने त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. क्लिनिकल व रक्त तपासणी केल्यानंतर त्यांच्या रक्तातील सोडियमची पातळी १३५ ते १४५ मिली असायला हवी ती १०१ मिली इतके कमी झाल्याचे आढळले. उपचारानंतर रक्तातील सोडियमची पातळी संतुलित करण्यात आली.

वयाच्या साठीनंतर ज्येष्ठांमध्ये सोडियमची कमतरता जाणवत आहे. तेही थाेडेथिडके नव्हे तर जवळपास ७० टक्के नागरिकांमध्ये हे प्रमाण कमी हाेत असल्याचे दिसून येत असल्याबाबत डाॅक्टरांचे निरीक्षण आहे. सोडियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी वृद्धांमध्ये यासंदर्भात जागरूकता निर्माण करणे गरजेचे असून त्याचे वेळीच निदान व उपचार झाल्यास ते उत्तम आयुष्य जगू शकतात.

वैद्यकीय भाषेत याला हायपोनेट्रेमिया असे म्हणतात. यामुळे मळमळ, उलट्या, डोकेदुखी, गोंधळ, थकवा, अस्वस्थता, चिडचिड, तंद्री, स्नायू कमकुवतपणा, कोमा, फेफरे येणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. उतारवयात साेडियमच्या कमतरतेबाबत जागरूकतेचाही अभाव आहे. त्यामुळे अनेक रुग्ण दुर्लक्षित राहतात. ही कमतरता दूर करण्यासाठी लोकांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत डाॅक्टरांचे आहे.

याबाबत इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. सम्राट शहा म्हणाले की, प्रौढांमध्ये, सामान्य रक्त सोडियम पातळी प्रति लिटर १३५ ते १४५ मिली असते. कोविड-नंतरच्या काळात हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जेव्हा रक्तामध्ये सोडियमची कमतरता असते तेव्हा शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते. परिणामी शरीरात सूज येते. एखादी व्यक्ती कोमातही जाऊ शकते. याचा मेंदूवर सर्वाधिक परिणाम होतो. गेल्या दोन महिन्यांत याच स्वरूपाचे गोंधळलेले १० रुग्ण पाहिले आहेत ज्यांच्यामध्ये तीन फेफरे असलेले, आणि दोन बोलण्याची पुनरावृत्ती असलेले रुग्ण आढळले.

साेडियमचे कार्य

सोडियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहताे. हे शरीरातील द्रवपदार्थ संतुलित करण्यास मदत करते. साेबत स्नायू आणि नसा सक्रिय करते. परंतू त्याच्या अभावी किडनी निकामी होणे, ह्रदय निकामी हाेणे, फुफ्फुस, यकृत आणि मेंदूची स्थिती आणि हार्मोनल असंतुलन अशा आरोग्याशी संबंधीत समस्या उद्भवू शकतात.

Web Title: low in sodium body after 60 years of age many cases in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.