कमी उत्पन्नाच्या मार्गावरील बसला दुपारची विश्रांती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 11:38 AM2019-09-18T11:38:03+5:302019-09-18T11:49:26+5:30
पीएमपीचे जवळपास ३७५ मार्ग असून दररोज सुमारे १८ ते १९ हजार फेऱ्या होतात....
पुणे : कमी उत्पन्न असलेल्या बसमार्गावरील तोटा कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) ब्रोकन पध्दत सुरू केली आहे. त्यानुसार सकाळी व सायंकाळी या गर्दीच्या वेळेतच बस मार्गावर सोडल्या जात आहेत. तर मधल्या वेळेत चालक व बसला विश्रांती दिली जात आहे. त्यामुळे खर्चामध्ये कपात होण्याबरोबरच मार्गावरील तोटाही कमी होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पीएमपीचे जवळपास ३७५ मार्ग असून दररोज सुमारे १८ ते १९ हजार फेऱ्या होतात. पण यातील अनेक फेऱ्यांचे उत्पन्न एकुण खर्चाच्या निम्मेही नाही. तर अनेक बसचे दैनंदिन उत्पन्न ३० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे 'पीएमपी'ला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्येच आता ब्रोकन पध्दतीला बळ दिले जाणार आहे. 'पीएमपी'चे तत्कालीन अध्यक्ष डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळात पहिल्यांदा ही पध्दत सुरू करण्यात आली होती. आता पुन्हा विविध मार्गांवर ब्रोकन पध्दत अवलंबली जात आहे. ज्या मार्गांवरील दैनंदिन उत्पन्न साधारणपणे ३० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा मार्गांवर ही पध्दत टप्प्याटप्याने सुरू केली जाणार आहे.
मार्गांच्या सुसूत्रीकरणासाठी प्रशासनाने बीआरटी प्रमुख अनंत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली मार्ग समिती स्थापन केली आहे. या समितीकडून ब्रोकनसाठीचे मार्ग निश्चित केले जात आहेत. तेजस्विनी बसला दुपारच्या सत्रामध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या बसचे मार्गही ब्रोकन करण्यात आले आहेत. साधारणपणे दुपारी १ ते ४ यावेळेत प्रवाशांची गर्दी कमी असते. यावेळेत संबंधित मार्गावरील फेऱ्या कमी केल्या जातात. सकाळी व सायंकाळच्या वेळेतच या मार्गावर बस सोडण्यात येतात. त्यामुळे मार्गावरील बसच्या खर्चात कपात होते.
.........
कमी उत्पन्न असलेल्या मार्गांवर ब्रोकन पध्दत फायदेशीर ठरत असल्याचे आतापर्यंतच्या अनुभवावरून सिध्द झाले आहे. त्यामुळे आता टप्प्याटप्याने कमी उत्पन्नाचे मार्ग निश्चित करून त्यावर ही पध्दत सुरू केली जात आहे. सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत ही पध्दत राबविली जात आहे. यामध्ये चालक व वाहक बदलण्याची गरज पडत नाही. तसेच दुपारी बस रिकाम्या धावल्यामुळे होणारे नुकसानही कमी होत आहे.
- अनंत वाघमारे, अध्यक्ष मार्ग समिती व बीआरटी प्रमुख