Heavy Rain: अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा हाहाकार; संपूर्ण जनजीवन विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 08:04 PM2021-12-01T20:04:10+5:302021-12-01T20:04:17+5:30
थायलंड परिसरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागर आणि अंदमान समुद्रात आले असून त्याचे येत्या दोन दिवसात चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे
पुणे : आग्नेय अरबी समुद्र व लगतच्या लक्ष्यद्वीप बेट समुह ते उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचवेळी थायलंड परिसरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागर आणि अंदमान समुद्रात आले असून त्याचे येत्या दोन दिवसात चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. ते ४ डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस दक्षिण भारतात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
लक्ष्यद्वीप बेट समुहापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात सध्या पाऊस पडत आहे. २ डिसेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वदूर पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पडलेला पाऊस (मिमी) पुणे १६, लोहगाव १६, कोल्हापूर २, महाबळेश्वर ६, नाशिक १९, सातारा २, मुंबई २८, सांताक्रूझ २९, अलिबाग २२, रत्नागिरी २, डहाणु १२, ठाणे २७ औरंगाबाद २ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
३ डिसेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
चक्रीवादळ आंध्र प्रदेश - ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता
दक्षिण थायलंड परिसरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारी मध्य अंदमान समुद्र परिसरात आले आहे. ते पश्चिम वायव्य दिशेला सरकून बंगालच्या उपसागरात गुरुवारी प्रवेश करेल. त्यानंतर त्याची तीव्रता वाढत जाईल. त्यानंतर त्याचे रुपांतर चक्रीवादळात होईल. ४ डिसेंबर रोजी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश - ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.