कमी सौर वादळांमुळे मान्सूनवर परिणाम शक्य : किरणकुमार जोहरे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 12:04 PM2018-11-26T12:04:43+5:302018-11-26T12:14:13+5:30
२०१८ या वर्षाप्रमाणेच २०१९ आणि २०२० या वर्षात कमी सौर धुमारे आणि कमी चुंबकीय वादळे होण्याची माहिती उपलब्ध होत आहे़
पुणे : सूर्यावरील सौर धुमारे आणि चुंबकीय वादळे यांचा परिणाम भारतीय मान्सूनवर होत असल्याचे गेल्या काही वर्षांच्या अभ्यासातून दिसून आले आहे़. २०१८ या वर्षाप्रमाणेच २०१९ आणि २०२० या वर्षात कमी सौर धुमारे आणि कमी चुंबकीय वादळे होण्याची माहिती उपलब्ध होत आहे़. त्यामुळे त्याचा विपरित परिणाम पुढील दोन वर्षे मॉन्सूनवर होण्याची शक्यता असल्याचा अंदाज मॉन्सूनचे अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केला आहे़.
याबाबत किरणकुमार जोहरे म्हणाले, सूर्याकडून आलेली ऊर्जा केवळ उष्णतेच्या स्वरूपातच नव्हे तर विद्युत चुंबकीय क्षेत्रात देखील बदल घडवून आणते. पृथ्वीचे चुंबकीय आवरण वातावरण संतुलनाचे कार्य करते. जितके सौर डाग जास्त, तितकी सौर वादळे जास्त व परिणामी सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त असे ढोबळमानाने म्हणता येईल. मान्सूनचा अभ्यास करताना व अंदाज वर्तवितांना सूर्यावरील घडामोडींचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. २०१८ वर्षाप्रमाणे वर्ष २०१९ आणि २०२० हे २४ क्रमांकाच्या आवर्तनाचे (सायकल) व किमान सौर (सोलर मिनिमा) डागांच्या वादळांचे वर्ष आहे. बेल्जियमच्या सोलार इन्फ्लुअन्सेस डाटा अॅनालिसीस सेंटर, (सीआयडीसी) या संस्थेच्या डाटाचे विश्लेषण करताना अनेक गोष्टी समोर आल्या आहेत़. यामुळे कमी सौर वादळाचे धुमारे (फ्लेम) निघाल्याची माहिती मिळते. नजीकच्या काळात हे कमी सौर धुमारे व कमी चुंबकिय वादळे होण्याची आहे. याचा थेट परिणाम मॉन्सूनवर होतो असे अभ्यासात आढळले आहे. जर सौर वादळांचा विचार केला तर भारतीय नैऋत्य मान्सून हा कमजोर होण्याची दाट शक्यता दिसून येते. कारण भारतीय भूभाग आणि या भूभागाजवळील सागराच्या पृष्ठभागाचे तापमान यातील आवश्यक फरक कमी झाल्याने मान्सून उशिरा आणि कमजोर होऊ शकेल, जो मध्य भारतात दुष्काळी परिस्थिती देखील निर्माण करू शकतो. २०१९ आणि २०२० वर्षी काळजी घेण्याची गरज आहे. यापूर्वी सौर आवर्तनाचे २२ आणि २३ क्रमांकांच्या आवर्तनाच्यावेळी अनुक्रमे १९८६ आणि २००९ मध्ये अशाच प्रकारे दुष्काळ पडला होता़.
भारतीय मॉन्सूनचा अंदाज व्यक्त करताना भारतीय हवामान विभाग सूर्यावरील घडामोडीचा विचार करीत नाहीत़. त्यामुळे त्यांचे अंदाज चुकण्याची अधिक शक्यता असते़ २०१८ मध्ये या कारणामुळेच त्यांचा अंदाज चुकल्याचे जोहरे यांनी सांगितले़.