Pune: पुणे विमानतळांवर कमी दृश्यमानतेत लँडिंग करणारी यंत्रणाच नाही उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 03:58 PM2021-12-06T15:58:15+5:302021-12-06T16:01:04+5:30

प्रसाद कानडे पुणे : पुणे विमानतळावर रविवारी १०० मीटर दृश्यमानता असल्याने १० विमानांना उशीर झाला, तर दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या ...

low visibility landing system problem pune airports | Pune: पुणे विमानतळांवर कमी दृश्यमानतेत लँडिंग करणारी यंत्रणाच नाही उपलब्ध

Pune: पुणे विमानतळांवर कमी दृश्यमानतेत लँडिंग करणारी यंत्रणाच नाही उपलब्ध

googlenewsNext

प्रसाद कानडे

पुणे :पुणे विमानतळावर रविवारी १०० मीटर दृश्यमानता असल्याने १० विमानांना उशीर झाला, तर दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या दोन विमानांना मुंबईत उतरावे लागले. धुक्यामुळे विमान वाहतुकीला फटका बसण्याची आठवड्यातील ही दुसरी वेळ आहे. देशातील दहा प्रमुख विमानतळांच्या यादीत येणाऱ्या पुणे विमानतळावर कॅट III (थ्री) बी ही अद्ययावत यंत्रणा नसल्याने पुणेकरांना याचा फटका बसत आहे. ही यंत्रणा असेल तर कमीत कमी म्हणजेच दृश्यमानता ५० मीटर जरी असेल तर सुरक्षितपणे लँडिंग करता येईल. जर ही यंत्रणा असेल तर कमी दृश्यमानतेतदेखील विमानांचे सुरक्षित लँडिंग होईल. प्रवाशांची मोठी सोय होईल.

गेल्या काही दिवसांत पुणे शहर व परिसरात सकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात धुके पडत आहे. शुक्रवार (दि. ३) रोजीदेखील दृश्यमानता कमी असल्याने पुणे विमानतळावर उतरणाऱ्या वीसहून अधिक विमानांना फटका बसला होता. तर चार विमानांना दुसऱ्या शहरात उतरावे लागले. रविवारीदेखील धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने १०हून अधिक विमानांना फटका बसला आहे. डिसेंबर महिन्यात पुण्यात धुक्याचे प्रमाण जास्त असते. तेव्हा येणाऱ्या दिवसांत ही परिस्थिती उद्भवू शकते. तेव्हा विमानतळ प्रशासनाने आता कॅट ३ बी ही यंत्रणा धावपट्टीवर बसविणे गरजेचे आहे. सध्या देशांत ही यंत्रणा दिल्ली, चंडीगड, गोवा, बेंगळुरू, कोलकाता या विमानतळावर बसविण्यात आली आहे.

कॅट ३ बीचा फायदा कोणता :

कमीत कमी म्हणजे ५० मीटर दृश्यमानता असेल तरीदेखील सुरक्षितपणे लँडिंग.

समुद्रसपाटीपासून धावपट्टी जरी ५० मीटर उंचीवर असेल तरीही यामुळे फायदा.

यात अद्ययावत ट्रान्समीटरचा वापर, त्यामुळे लँडिंग सुरक्षित होण्यास मदत मिळते.

कॅट ३ बी कसे काम करते :

जिथे लँडिंग होते, म्हणजे धावपट्टीच्या सुरुवातीला कॅट ३ बी ही यंत्रणा बसविण्यात येते. हा एक इंस्ट्रुमेंटल लँडिंगमधला एक प्रकार आहे. ही यंत्रणा धावपट्टीवर, विमानांतदेखील बसविलेली असते. रेडिओ बेस सिग्नलिंग सिस्टीमद्वारे वैमानिकांना सूचना देऊन लँडिंग केल जाते. यासाठी वैमानिकांनादेखील विशेष प्रशिक्षण दिले जाते.

कमी दृश्यमानतेमुळे विमानसेवेवर विपरीत परिणाम होणार असेल तर ते ठीक नाही. शहराच्या आर्थिक विकासासाठी पुण्यातील विमानसेवा ही सक्षम असणे गरजेचे आहे. तेव्हा विमानतळ प्रशासनाने कॅट ३ बी ही यंत्रणा बसवून धुक्यामुळे विमान वाहतुकीत निर्माण होणारा अडसर दूर करावा.

- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ, पुणे

लोहगांव विमानतळावरील धावपट्टी वायुदलाच्या अखत्यारीत येते. त्या ठिकाणी कॅट ३ बी ही यंत्रणा आहे की, नाही हे मला सांगता येणार नाही. वायुदलच याबद्दल बोलू शकेल.

- संतोष डोके, विमानतळ संचालक, पुणे

Web Title: low visibility landing system problem pune airports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.