बारामती तालुक्यात कमी वजनाची बालके

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 01:22 AM2018-07-12T01:22:03+5:302018-07-12T01:22:28+5:30

बारामती तालुक्यात तीव्र कमी वजनाची ७२ बालके आढळली आहेत. तालुक्यातून डोर्लेवाडी गावामध्ये सर्वांत जास्त तीव्र कमी वजनाची १५ बालके आढळली आहेत. बालग्राम विकास योजनेतून पुढील दोन महिने या बालकांना अतिरिक्त पोषक आहार देण्यात येणार आहे.

 Low-weight children in Baramati | बारामती तालुक्यात कमी वजनाची बालके

बारामती तालुक्यात कमी वजनाची बालके

Next

बारामती - बारामती तालुक्यात तीव्र कमी वजनाची ७२ बालके आढळली आहेत. तालुक्यातून डोर्लेवाडी गावामध्ये सर्वांत जास्त तीव्र कमी वजनाची १५ बालके आढळली आहेत. बालग्राम विकास योजनेतून पुढील दोन महिने या बालकांना अतिरिक्त पोषक आहार देण्यात येणार आहे. त्याद्वारे या बालकांना सदृढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी मिथुनकुमार नागमवाड यांनी दिली.
जिल्ह्यात सर्वप्रथम बारामती तालुक्यामध्ये महिला व बालकल्याण विभागांतर्गत बालग्राम विकास योजनेची अंमलबजावणीस सुरुवात झाली. जिल्ह्यात कुपोषणाच्या बाबतीत बारामती तालुक्याचा दुसरा क्रमांक लागल्याने खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे बारामती पंचायत समितीचा बालकल्याण विभाग तीव्र कुपोषीत बालकांना सदृढ करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. बारामती तालुक्यात अंगणवाडीतील कमी वजनाच्या बालकांसाठी आता अतिरिक्त आहारसंहिता व औषधसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून बारामती तालुक्यातील कमी वजनाच्या बालकांसाठी ६० दिवस अतिरिक्त आहार दिला जाणार आहे. बारामती तालुक्यातील ४१६ अंगणवाड्यांत महिनाभरापूर्वी अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षीका यांनी केलेल्या सर्वेक्षणात उंचीनुसार तीव्र कमी वजनाची व बुटकी बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. बारामती तालुक्यात प्रकल्प एकच्या विभागात ५० कमी वजनाची बालके आहेत. प्रकल्प दोनमध्ये २२ बालके अशी एकूण ७२ तीव्र कमी वजनाची बालके आढळून आली आहेत.

अंगणवाडीत देणार अतिरिक्त आहार

कमी वजनाच्या बालकांना आहार देण्याच्या अगोदर त्यांचे वजन तपासून नोंद ठेवली जाणार आहे. बारामती तालुक्यात ५० ठिकाणी ६० दिवस अंगणवाडीतच सकाळी आठपासून संध्याकाळी सहापर्यंत दर दोन तासाला वेगवेगळ्या पद्धतीने अतिरिक्त आहार देऊन कमी वजनाच्या बालकांना जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाकडून लोहवर्धक, कॅल्शियमयुक्त औषधे, प्रोटिन कार्बोहायड्रेड असलेले पदार्थ असे वजनवाढीसाठी दिली जाणार आहेत. त्याचबरोबर आहारात पिठाची लापशी, रवा, उपमा, खीर, शेंगदाणे, खोबऱ्याचा किस, उकडलेले बटाटे, अंडी, फळे, गुळ, शेंगदाणे, खजूर, राजगीरा लाडू, अंगणवाडीतील दोन वेळेतील आहार व घरचा आहार अशा पद्धतीने दिवसभरात बालकांना अतिरिक्त आहार दिला जाऊन या बालकांना सदृढ करण्यात येणार आहे.

बारामती तालुक्यातील ४१६ पैकी २३६ अंगणवाड्यांमध्ये परसबागा फुलणार आहेत. या परसबागांमध्ये शेवग्याची शेंग, कढीपत्ता, बीट, टोमॅटो, बटाटा, मेथी, केळी, ढोबळी मिरची, काकडी, पालक आदी सकस फळभाज्यांचे उत्पादन घेऊन त्यांचा वापर बालकांच्या आहारामध्ये करण्यात येणार आहे.

Web Title:  Low-weight children in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.