नीरा डावा कालव्याचे पाणी पेटले
By admin | Published: May 29, 2017 02:19 AM2017-05-29T02:19:33+5:302017-05-29T02:19:33+5:30
इंदापूर तालुक्यात नीरा डावा कालव्याचे पाणी पेटले आहे. कालव्याच्या पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. ५४ फाटा, लासुर्णेपाठोपाठ
लोकमत न्यूज नेटवर्क
भवानीनगर : इंदापूर तालुक्यात नीरा डावा कालव्याचे पाणी पेटले आहे. कालव्याच्या पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. ५४ फाटा, लासुर्णेपाठोपाठ रविवारी (दि. २८) ३६ फाट्यावरील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
नीरा डावा कालव्यावरील वितरिका क्रमांक ३६वर अवलंबून असणाऱ्या सणसर, हिंगणेवाडी, सपकळवाडी, कुरवली आदी भागातील शेतकऱ्यांनी रविवारी सणसर पाटबंधारे वसाहत येथे रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे अर्धा तास सुरु असलेल्या या आंदोलनामुळे बारामती- इंदापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा’ आदी घोषणांनी या वेळी सणसर परिसर दुुमदुमला. चेहरे पाहून पाणी दिले जाते, तीन महिन्यांपासून सोडण्यात आलेले पाणी नेमके कुठे गेले, बारमाही पाणीपट्टी भरणारा शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहतो. मात्र, सायफनद्वारे ठराविक जणांना मुबलक पाणी मिळते. त्यासाठी पाटबंधारे खात्याचे अधिकारी मदत करतात, अशा तक्रारी या वेळी शेतकऱ्यांनी मांडल्या. दिलीप पांढरे, दीपक कदम, नंदकुमार सपकळ आदींनी या वेळी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या वेळी आंदोलनात आबासाहेब निंबाळकर, शिवाजी सपकळ, किरण गायकवाड, संजय सपकळ, रवींद्र कदम, दत्तात्रय सपकळ आदी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरील ठप्प झालेली वाहतूक सुरळीत होण्यासाठी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर येथील आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, पाणी सोडण्याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत पाटबंधारे कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला. दोन तासांहून अधिक वेळ शेतकरी या ठिकाणी बसून होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत...
या वेळी छत्रपती कारखान्याचे संचालक प्रदीप निंबाळकर यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना जाब विचारला. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या आवर्तनाची केवळ सणसर परिसरात अंमलबजावणी होत नाही. या ठीकाणी उन्हाळ्यातील पहिले आवर्तन अद्याप सुरु आहे. तेदेखील पाणी मिळाले नाही.
याच कालव्यावर इतरत्र मात्र, दुसरे उन्हाळी आवर्तन सुरु आहे. हा येथील शेतकऱ्यांवर अन्याय आहे. कार्यकारी अभियंता कार्यालयदेखील शेतकऱ्यांना अधिकारी सहज
उपलब्ध होतील, अशा ठिकाणी असावे. त्यांचे पुणे येथील कार्यालय शेतकऱ्यांसाठी निरुपयोगी आहे.
धरण १०० टक्के भरूनदेखील शेतकऱ्यांवर ही वेळ आली. नियोजन करता येत नसल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत, अशी संतप्त प्रतिक्रिया निंबाळकर
यांनी व्यक्त केली.
या भागात शेतकरी आत्महत्या करतील...
नीरा डावा कालव्याच्या पाण्यापासून ३६ फाट्यावरील शेतकऱ्यांना सातत्याने वंचित ठेवले जात आहे. पाण्याअभावी शेती जळून जाण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. वेळेत पाणी न मिळाल्यास या भागातदेखील शेतकरी आत्महत्या करतील, अशी भीती इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्रामसिंह निंबाळकर यांनी व्यक्त केली.
जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे तक्रार करणार...
शेतकरी पाणीपट्टी भरतात. पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. पाणी न मिळाल्याने आता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायत इंदापूरच्या वतीने जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे तक्रार करण्यात येणार आहे, अशी माहिती इंदापूर तालुका संघटक प्रशांत साळुंके , सणसरचे संघटक संजय निंबाळकर यांनी दिली.