पहिलीपेक्षा पाचवी व सातवीच्या विद्यार्थ्यांना गणवेशासाठी कमी पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 03:55 AM2018-08-23T03:55:42+5:302018-08-23T03:56:06+5:30
गरीब विद्यार्थ्यांना फटका; महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर
पुणे : पालिकेच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक नमुना पुढे आला असून, पहिलीच्या विद्यार्थ्यांना गणवेश खरेदीसाठी ७३२ रुपये देण्यात आले आहे. त्याच शाळांमधील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मात्र केवळ ३६० रुपये देण्यात आली आहे. या भोंगळ कारभाराचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसला आहे.
गणवेश व शालेय साहित्य खरेदीमध्ये होणारा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षांत महापालिकेच्या वतीने निविदा प्रक्रिया न राबविता निधी थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी महापालिकेच्या शाळेत १ ली ते ७ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्याच्या बाजारातील दर लक्षात घेऊन एकत्रित रक्कम थेट विद्यार्थी अथवा पालकांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही रक्कम देताना झालेल्या सावळा गोंधळ चव्हाट्यावर आल्या आहे. प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या रक्कमेचा प्रशासनाने गोंधळ केला आहे. पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशासाठी ७३२ रुपये, दुसरीसाठी ७५६ रुपये, तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७८२ रुपये, चौथीसाठी ८०४ असा चढत्या क्रमाने दर दिला आहे, त्यानुसार पुढे ५वी ते ७वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेशाची रक्कम देण्यात येणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाने पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशासाठी फक्त ७२० रुपये याप्रमाणे रकमेचे वाटप केले आहे. एका गणवेशासाठी विद्यार्थ्यांच्या हातात केवळ ३६० रुपये पडणार आहे. भांडार विभागाचे प्रमुख तुषार दौंडकर यांच्याकडे विचारणा केली असताना, त्यांनी प्रिटिंग मिस्टेकमुळे हा प्रकार घडला असे स्पष्टीकरण दिले. मात्र, ही चूक मराठी, इंग्रजी, उर्दू या माध्यमांबरोबर विद्यानिकेतनच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या बाबतीतही घडली आहे. हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतरही विद्यार्थ्यांना वाढीव रक्कम देण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली गेलेली नाहीत.