Pune Rain: गेल्या १० वर्षांमध्ये जूनमध्ये आतापर्यंतचा सर्वात कमी पाऊस; जोरदारची पुणेकरांना अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 01:13 PM2023-07-17T13:13:18+5:302023-07-17T13:13:44+5:30
यंदाही कदाचित जुलै महिन्याच्या अखेरीस जोरदार पाऊस होण्याची शक्यता
पुणे : शहरामध्ये यंदा जून महिन्यात ८३.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दहा वर्षांमधील या महिन्यातील हा तिसरा सर्वात कमी पाऊस नोंदवला गेला आहे. २०१४ मध्ये केवळ १३.८ मिमी पडला होता, तर २०२२ मध्ये ३५ मिमीची नोंद झाली होती. जुलै महिन्यातील पंधरा दिवस संपले असून, आतापर्यंत केवळ ४० मिमीची नोंद झाली असून, ही गेल्या दहा वर्षांमधील सर्वात कमी पावसाची नोंद ठरली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेमध्ये वाढ होणार आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा पाऊस कमी असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या पावसाने ते स्पष्टच होत आहे. जूनमध्ये मान्सून उशिरा दाखल झाला. त्यानंतर जूनमध्ये पावसाला जोर नव्हता. त्यानंतर जुलै महिन्यात तरी चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु, अर्धा महिना संपला तरी जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये पावसाचा भरवसाच राहिलेला नाही. गेल्या वर्षीदेखील जून महिन्यात केवळ ३५ मिमी पाऊस झाला होता, तर जुलैमध्ये मात्र पूरस्थिती आली होती. तेव्हा ३८६ मिमी पावसाची नोंद झाली. यंदाही कदाचित जुलै महिन्याच्या अखेरीस जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानेही तसा अंदाज दिला आहे.
''पुणे शहरातील पाऊस सरासरीपेक्षा उणेच आहे. शिवाजीनगरमध्ये उणे ४६ टक्के, पाषाण उणे ३०, लोहगाव उणे २० पाऊस आहे. परंतु, येत्या काही आठवड्यात ही सरासरी भरून निघेल. - अनुपम कश्यपी, विभागप्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग''