मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात घट; पुण्यात हंगामातील निचांकी ११.५ सेल्सिअसची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 03:23 PM2017-11-13T15:23:49+5:302017-11-13T16:21:12+5:30
राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत ४ ते ५ अंशांनी घट झाली आहे़. उत्तरेकडील वार्यांचा प्रभाव वाढल्याने राज्यात गारठा वाढला आहे़
पुणे : राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत ४ ते ५ अंशांनी घट झाली आहे़ सोमवारी सकाळी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १०.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़
उत्तरेकडील वार्यांचा प्रभाव वाढल्याने राज्यात गारठा वाढला आहे़ त्यामुळे संपूर्ण राज्यातील अनेक शहरातील पारा घसरला आहे़ अहमदनगर, सोलापूर, गोंदिया, परभणी, वेंगुर्ला यवतमाळ येथील किमान तापमानात सरासरीपेक्षा ५ अंशांनी घट झाली आहे़ विदर्भातील काही ठिकाणी तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेनीय घट झाली आहे़
पुणे शहरात रविवारी या हंगामातील निचांकी ११.५ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली होती़ त्यात सोमवारी किंचित घसरण होऊन ११.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले़ थंडी वाढल्याने शहरात अनेक ठिकाणी रात्री रस्त्याच्या कडेला शेकोट्या पेटलेल्या दिसत होत्या़ रात्री सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्या काही जणांनी तेथेच एकत्र येऊन शेकोटी पेटवून त्यापासून उब मिळविण्याचा प्रयत्न करीत होते़
पुढील काही दिवस तापमानातील घट अशीच कायम राहण्याची शक्यता असून १८ नोव्हेंबरला त्यात आणखी घट होण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे़
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सियस) पुणे ११.४, अहमदनगर १०.७, नाशिक १०.२, सांगली १३.६, सातारा ११.५, सोलापूर १३.१, उद्गीर १४.८, परभणी १२.५, अकोला १३.७, बुलढाणा १४.६, चंद्रपूर १६.६, गोंदिया १२.६, नागपूर १२.९, अलिबाग १८.८, अमरावती १६.२, औरंगाबाद १३, बीड ११.९, डहाणु १८.४, जळगाव १३, कोल्हापूर १५.५, महाबळेश्वर १३.६, मालेगाव १४, मुंबई १९.३, नांदेड १४.५, रत्नागिरी १७.९, वेंगुर्ला १६.७, वर्धा १३.६, यवतमाळ १२.२़