उद्धव ठाकरेंच्या भेटीला निघाला निष्ठावंत शिवसैनिक; सायकलवरून तब्बल ४२४ किमी अंतर पार करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 12:48 PM2022-08-05T12:48:59+5:302022-08-05T12:49:18+5:30
शिवसैनिक नितीन सुकाळे (रा. वाशी, जि. उस्मानाबाद) हे वाशी ते मुंबई सायकलवरून निघाले आहेत
धनकवडी : शिवसेनेतील सत्तासंघर्ष आणि अंतर्गत बंडाळीमुळे उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. याचे शल्य शिवसैनिकांच्या मनात आहे. पक्षनिष्ठा आणि आपण सदैव उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, हे दाखवून देण्यासाठी एक निष्ठावंत कट्टर शिवसैनिक सायकलवरून तब्बल ४२४ किमी अंतर पार करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. या शिवसैनिकाचे नाव आहे नितीन सुकाळे.
शिवसैनिक नितीन सुकाळे (रा. वाशी, जि. उस्मानाबाद) हे वाशी ते मुंबई सायकलवरून निघाले आहेत. त्यांनी १ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता सायकलवरून प्रवास सुरू केला. बुधवारी (दि. ३) सायंकाळी ते पुण्यात दाखल झाले. यावेळी शिवसेना शहर उपप्रमुख बाळासाहेब मालुसरे यांच्यासह हनुमंत दगडे, भास्कर बलकवडे, गणी पठाण, धनंजय क्षीरसागर यांनी त्यांचे स्वागत केले.
दरम्यान, उस्मानाबादवरून निघालेल्या सुकाळे यांना पुण्यात दाखल होईपर्यंत चार मुक्काम करावे लागले. यावेळी त्यांनी कधी मंदिर तर कधी सार्वजनिक बाकावर तर कधी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला. यादरम्यान ठिकठिकाणी होणाऱ्या स्वागतामुळे सुकाळे यांना पुढील प्रवासाला बळ मिळत असून जनतेचे शिवसेनेवरील प्रेम कायम असल्याचे सिद्ध होत आहे. सुकाळे यांची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य आहे. ते वाशी तालुक्यात सेंट्रिंग मिस्त्रीचे काम करतात. दरम्यान, पुण्यात बुधवारी सायंकाळी नितीन सुकाळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘शिंदे गटाने शिवसेनेसोबत केलेल्या बंडानंतर तळागाळातील सर्वसामान्य शिवसैनिक मोठ्या प्रमाणात दुखावला गेला आहे. अशावेळी आम्ही सामान्य शिवसैनिक तुमच्यासोबत आहोत हे सांगण्यासाठी मी वाशी ते मुंबई असा प्रवास करत आहे.’