पावणेतीन कोटी गरिबांना स्वयंपाकाचा गॅस; उत्तर प्रदेश टॉपवर, ईशान्य भारत खूपच मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 04:43 AM2017-09-01T04:43:09+5:302017-09-01T04:43:22+5:30
चूलमुक्त भारत करण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या उज्ज्वला योजनेअंतर्गत अवघ्या दीड वर्षातच २ कोटी ७० लाख स्वयंपाक गॅस जोड वितरित करण्यात आले. देशात सर्वाधिक स्वयंपाक जोड उत्तर प्रदेशांत वितरित करण्यात आले असून, महाराष्ट्राचा क्रमांक आठवा लागतो.
विशाल शिर्के
पुणे : चूलमुक्त भारत करण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या उज्ज्वला योजनेअंतर्गत अवघ्या दीड वर्षातच २ कोटी ७० लाख स्वयंपाक गॅस जोड वितरित करण्यात आले. देशात सर्वाधिक स्वयंपाक जोड उत्तर प्रदेशांत वितरित करण्यात आले असून, महाराष्ट्राचा क्रमांक आठवा लागतो.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत स्वयंपाक गॅस वितरण कार्यक्रम २०१६-१७ या आर्थिक वर्षापासून हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार तीन वर्षांत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना ५ कोटी एलपीजी गॅस जोड बसविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. देशातील ग्रामीण भागात लाकूड, गोवºया, करोसिन आणि बायोमासचा उपयोग स्वयंपाकासाठी केला जातो. त्यासाठी जंगलतोड होतेच; शिवाय धुरामुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे ही योजना हाती घेण्यात आल्याची माहिती, केंद्रीय पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालयाने माहिती अधिकारात दिली आहे.
या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील प्रौढ महिलेला सोळाशे रुपयांचे अनुदान दिले जाते. यासाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षांत अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी २ हजार ४९९ कोटींहून अधिक निधी खर्च झाला आहे. त्यातून २ कोटी ३१ हजार ८६६ गॅसजोड वितरित करण्यात आले. चालू आर्थिक वर्षांतही अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी १ हजार २८९ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. यातून ७६ लाख ५ हजार ५२४ गॅसजोड वितरित करण्यात आले. माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी ही माहिती समोर आणली आहे.
ईशान्य भारतातील मणिपूर ८ हजार ३२४, मेघालय ६ हजार ४०४, मिझोरम आणि सिक्कीम शून्य, नागालँड ३ हजार १२४ आणि त्रिपुरा येथे ५०१ गॅसजोडण्या देण्यात आल्या आहेत. तेलंगणा येथील संख्यादेखील केवळ ४० गॅसजोड इतकी नीचांकी असून, गोव्यात ९७४ व दिल्लीत ४७७ गॅसजोडण्या देण्यात आल्या आहेत.
गॅसजोड वितरण संख्या
राज्य २०१६-१७ २०१७-१८ जोडणीची अंतिम संख्या
उत्तर प्रदेश ५५,३१,१५९ ४,६९,८२७ ५९,७३,६८९
पश्चिम बंगाल २५,२०,४७९ १८,०२,७७० ४१,३७,५९३
बिहार २४,७६,९५३ १३,७०,७८३ ३६,९७,१२२
मध्य प्रदेश २२,३९,८२१ ४,१५,२३४ २६,३७,१२६
राजस्थान १७,२२,६९४ ४,५५,२३० २१,६३,१८९
ओडिशा १०,११,९५५ ५,१२,०९९ १४,९५,६४२
छत्तीसगड ११,०५,४४१ ३,९०,२९८ १४,४१,३५२
महाराष्ट्र ८,५८,८०८ ५,३८,१२४ १३,५९,८७१
गुजरात ७,५२,३५४ ३,२३,०६३ १०,५३,७३८
झारखंड ५,३६,९१२ २,४४,४६९ ७,४९,३१२