ले. जनरल धीरज सेठ यांनी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

By नितीश गोवंडे | Published: July 1, 2024 07:49 PM2024-07-01T19:49:12+5:302024-07-01T19:49:27+5:30

ले. जनरल धीरज सेठ हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे, तसेच डेहराडून येथील भारतीय लष्कर अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत

Lt. General Dheeraj Seth took charge as the Chief of the Southern Division of the Army | ले. जनरल धीरज सेठ यांनी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

ले. जनरल धीरज सेठ यांनी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

पुणे : लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी सोमवारी लष्कराच्या दक्षिण विभागाचे ५१ वे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला. लष्करी परंपरेनुसार लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी पुण्यातील युद्ध स्मारकात झालेल्या सोहळ्यात, शुरवीरांचे स्मरण करून त्यांना पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर त्यांना दक्षिण विभागाच्या मुख्यालयात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

ले. जनरल धीरज सेठ हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे, तसेच डेहराडून येथील भारतीय लष्कर अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. २० डिसेंबर १९८६ रोजी सेकंड लान्सर्समधील नियुक्तीने त्यांच्या लष्करी कारकीर्दीला सुरूवात झाली होती. लष्करी प्रशिक्षणाशी संबंधित सर्व अभ्यासक्रमांमध्ये त्यांनी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. यंग ऑफिसर्स प्रशिक्षण अभ्यासक्रमात त्यांनी सिल्व्हर सेंच्युरियन पुरस्कार पटकावला होता, तर नभोवाणी मार्गदर्शक अर्थात रेडिओ इंस्ट्रक्टर प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि ज्युनिअर कमांड प्रशिक्षण अभ्यासक्रमात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. वेलिंग्टन इथल्या संरक्षण सेवा कर्मचारी प्रशिक्षण अभ्यासक्रम अर्थात डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कोर्समध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ट अष्टपैलू विद्यार्थ्याचा पुरस्कार आपल्या नावे केला होता. 

ले. जनरल धीरज सेठ यांनी स्कायनर्स हॉर्स ९८ सशस्त्र लष्करी तुकडीचे प्रमुख, दहशतवादविरोधी दलाचे प्रमुख, २१ कोअरचे प्रमुख तसेच दिल्ली क्षेत्राचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ले. सेठ यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षक आणि वरिष्ठ सहाय्यक म्हणून, तर अहमदनगर येथील आर्मड कोअर सेंटर अँड स्कुल येथे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही सेवा दिली आहे. लष्कराच्या दक्षिण विभागाचे ५१ वे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून पदभार सांभाळण्याआधी ले. जनरल धीरज सेठ हे १ नोव्हेंबर २०२३ ते ३० जून २०२४ या कालावधीत दक्षिण पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. 

Web Title: Lt. General Dheeraj Seth took charge as the Chief of the Southern Division of the Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.