Lumpy Virus: बैलपोळ्यावर लम्पी आजाराचे सावट; यंदाही ना मिरवणूक, ना शर्यती...,
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 12:00 PM2022-09-21T12:00:01+5:302022-09-21T12:00:15+5:30
लम्पीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने बैलपोळा साधेपणाने साजरा करण्याचा आदेश जारी केला आहे
रोहोकडी : बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर यंदा रविवारी (दि. २५) होणाऱ्या भाद्रपद बैलपोळा सणासाठी शेतकऱ्यांनी तयारी केली होती. पण लम्पी आजाराने यावर पाणी फिरवले आहे. लम्पीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने बैलपोळा साधेपणाने साजरा करण्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे यंदाही मिरवणूक किंवा शर्यतीही भरवता येणार नाही.
जुन्नर तालुक्यातील ९० टक्के गावात भाद्रपद महिन्याच्या अखेरीस अमावस्येला बैलपोळा साजरा करण्याची परंपरा आहे. गेली दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने बैलपोळा साजरा झाला नाही. त्यात बैलपोळा या वर्षी चांगल्या पद्धतीने साजरा होईल असे वाटले होते, म्हणून बैल सजविण्यासाठीचे लागणारे साहित्य घुंगरमाळा, शेम्बी, झूल, रंगाचे डबे, चवर, बाशिंगे, वेसणदोरे, कासरा, गोंडे, फुले, ब्यागडे, हिगळ, चाबोक, पितळी साकळ्या यांची खरेदी केली. मात्र यंदा लम्पी आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बैलपोळा साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
लम्पीच्या नियंत्रण व प्रतिबंधासाठी जनावरे, गाय-म्हशींचा बाजार भरवणे, प्राण्याच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन यावर बंदी घालण्यात आली आहे. पशुधनाच्या वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतीने यासंदर्भात बोर्ड, फ्लेक्स किंवा दवंडी देऊन सर्व पशुपालकांना अवगत करण्याचे आवाहन जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी केले आहे.