Lumpy | राज्यात लम्पीचा धुमाकूळ; १६ हजार जनावरे दगावली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 02:19 PM2022-11-15T14:19:47+5:302022-11-15T14:20:02+5:30
रोज पाच हजार गुरे लम्पीच्या विळख्यात : मृत्युदर साडेसहा टक्क्यांवर...
- ज्ञानेश्वर भाेंडे
पुणे : राज्यात जनावरांमधील लम्पी या चर्मराेगाचे लसीकरण हाेऊनही धुमाकूळ कमी होण्याचे नाव घेत नाही. ऑगस्टमध्ये पहिले बाधित जनावर आढळल्यानंतर अवघ्या १०० दिवसांत राज्यात तब्बल अडीच लाख गुरांना या जीवघेण्या रोगाने घेरले आहे. त्यापैकी १६ हजारांहून अधिक जनावरांनी जीव साेडला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे काेट्यवधींचे नुकसान झाले आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री व विभागाचे अधिकारी दौरे करून मृत जनावरांची नुकसानभरपाईची आकडेवारी जाहीर करत आहेत.
यावर्षी ४ ऑगस्टला प्रथमच जळगाव जिल्ह्यात लम्पीबाधित गुरे आढळली. त्यानंतर मात्र त्याचा प्रसार नगर, अमरावती, अकाेला, बुलढाणा, काेल्हापूर, सांगली या जिल्ह्यांत झपाट्याने झाला. सध्या राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३ हजार ५४३ गावांत एकूण २ लाख ४२ हजार ७५१ गुरांना बाधा झाली आहे. त्यापैकी १ लाख ७१ हजार ५६४ गुरे उपचाराने बरी झाली आहेत. उर्वरित ७१ हजार बाधित गुरांवर उपचार सुरू आहेत, तर १६ हजार १५० गुरे दगावली आहेत.
शासन नुकसानभरपाईत मानतेय धन्यता
आजपर्यंत लम्पीमुळे मृत्युमुखी पडलेल्या ५ हजार ३३४ जनावरांच्या पशुपालकांच्या खात्यांवर नुकसानभरपाईमुळे १३.६७ कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र, दुभत्या जनावरांसाठी ३० हजार, बैलासाठी २५ हजार आणि वासरासाठी १६ हजार इतकी तुटपुंजी भरपाई देण्यात येते.
शेतकऱ्यांचे चाळीस काेटींचे नुकसान
आतापर्यंत मृत जनावरांमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीचा आकडा भयावह आहे. आतापर्यंत १६ हजार १५० जनावरे मृत झाल्याने प्रतिजनावर २५ हजार रुपयांनी जरी नुकसान पकडले तरी ताे आकडा ४० काेटी ३७ लाख इतका हाेताे. प्रत्यक्षात बाजारामध्ये त्या गुरांची किंमत ही जास्तच असल्याने हे नुकसान दुपटीनेदेखील हाेऊ शकते.
मृत्युदर साडेसहा टक्के
आतापर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांत मिळून २ लाख ४१ हजार गुरांना लम्पीची बाधा झाली असून, त्यापैकी १६ हजार १५० गुरांनी जीव गमावला आहे. हा मृत्युदर तब्बल ६.७ टक्के इतका आहे. म्हणजेच शंभर बाधित गुरांमध्ये सहा जनावरांनी जीव गमावला आहे.
लसीकरण हाेऊनही आजार येईना आटाेक्यात
पशुसंवर्धन विभागाने राज्यात १ काेटी ४४ लाख लसींचे डाेस उपलब्ध करून दिले आहेत. त्याद्वारे १ काेटी ३७ लाख पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. तर, खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे ९८ टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र, तरीही ना आजार आटाेक्यात येताेय ना मृत्यू कमी हाेताहेत.
राज्यातील लम्पीबाधित आकडेवारीवर दृष्टिक्षेप :
एकूण गुरांना बाधा - २ लाख ४१ हजार
बरे झालेले - १ लाख ७१ हजार
उपचार सुरू असलेले - ७१ हजार
मृत्यू झालेले - १६ हजार १५०
लसीकरण झालेले - १ काेटी ३७ लाख
नुकसान भरपाई - ५ हजार ३३४ (१३.६७ काेटी)