भिर्रर्र... असा आवाज कानी पडताच सुसाट वेगाने धावणाऱ्या "अर्जुन"चा प्रवास लम्पिने थांबवला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 10:22 AM2022-09-27T10:22:14+5:302022-09-27T10:24:23+5:30
पुणे जिल्ह्यातील अनेक शर्यतींचे घाट आपल्या वेगाने अर्जुनने गाजवले....
शेलपिंपळगाव (पुणे) : ''अर्जुन'' घाटात उभा राहिला की त्याला फक्त धावपट्टी आणि निशाण दिसायचं. अनेक गावांमधील यात्रा व उत्सवामधील शर्यती अर्जुनने फळीफोड व नंबर एकने गाजवल्या. झाली भिर्रर्र... असा आवाज कानी पडताच सुसाट वेगाने लांबलचक असणारी ती धावपट्टी अगदी काही सेकंदात लिलया पार करून कित्येक विजयश्री खेचून आणत आपल्या मालकाचे नाव रोशन केले. मात्र ''अर्जुन'' या जिगरबाज बैलाचा प्रवास बैलपोळा सणाच्या दिवशी लम्पीने थांबवला. शेलगाव (ता. खेड) येथील रसिका बैलगाडा संघटनेच्या लाडक्या बैलाची ही गोष्ट.
शेलगाव येथील रसिका बैलगाडा संघटनेचे संस्थापक तथा बैलगाडा मालक पांडुरंग कुऱ्हाडे यांनी अडीच वर्षांपूर्वी म्हैसूर येथून दीड लाख रुपयांना अर्जुनची खरेदी केली. गावरान - बेरड जातीच्या असणाऱ्या या म्हैसूऱ्या ''अर्जुन'' नामक बैलाला कुऱ्हाडे परिवाराने दर्जेदार खुराक खाऊ घालून शर्यतीयोग्य बनविले. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविल्याने गावोगावी शर्यती सुरू झाल्या. अर्जुननेही मालकाचा विश्वास सार्थ खरा ठरवत शर्यतींमध्ये ''धुरेकरी'' म्हणून धावण्यास सुरुवात केली.
पुणे जिल्ह्यातील अनेक शर्यतींचे घाट आपल्या वेगाने अर्जुनने गाजवले. किवळे, गुळाणी, गणेगाव - वरुडे, जाधववाडी अशा कित्येक घाटांमध्ये बारी बसवत रोख पारितोषिके, ट्रॉफी तर जाधववाडीच्या घाटात बक्षीसरूपी दुचाकी जिंकून दिली. अर्जुनच्या सुसाट प्रवासाचे घाटात चर्चा आणि कौतुकही होऊ लागले. अनेक छकडीमालक अर्जुनला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी लाखों रुपयांची ऑफर देत होते. मात्र कुऱ्हाडे यांनी पैशामागे न पळता अर्जुनची विक्री करणार नसल्याचे ठामपणे सांगितले.
अर्जुनला लम्पी आजाराने ग्रासले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी अर्जुनची पाहणी करून लसीकरण केले. त्यानंतरही कुऱ्हाडे कुटुंबीयांनी खासगी उपचार सुरू केले. मात्र शर्तीचे प्रयत्न करूनही बैलपोळ्याच्या दिवशी अर्जुनने अखेरचा श्वास घेतला. दुःखद वातावरणात विधिवत पूजन करून कुऱ्हाडे कुटुंबीयांनी अर्जुनचे अंत्यसंस्कार केले. सोशल मीडियावरून अनेक गाडामालकांनी ''अर्जुन''ला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.