Lumpy: पुण्यात लम्पी आटोक्यात; राज्यातील सर्वात कमी जनावरांचा मृत्यू पुणे जिल्ह्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 04:32 PM2022-12-08T16:32:59+5:302022-12-08T16:35:30+5:30
सर्वाधिक मृत्यू बुलढाणा जिल्ह्यात ४ हजार ५१० इतके झाले आहेत.
पुणे : राज्यातील पशुधनाच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पुणे जिल्ह्यात लम्पीमुळे मृत्यू झालेल्या जनावरांची संख्या मात्र, राज्यात सर्वात कमी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ६३३ जनावरे लम्पीमुळे मृत्युमुखी पडले असून सर्वाधिक मृत्यू बुलढाणा जिल्ह्यात ४ हजार ५१० इतके झाले आहेत. जिल्हा परिषदेने केलेल्या तातडीच्या उपयायोजनांमुळे ही संख्या नियंत्रणात राहिली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
लम्पी विषाणूचा संसर्ग आता राज्यभरात घटत असून सध्या ३५ जिल्ह्यांमधील ३९७० संसर्ग केंद्रांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील ३ लाख ५८ हजार ७६९ बाधित जनावरांपैकी २ लाख ७६ हजार ८६२ जनावरे उपचाराने बरे झाले आहेत. उर्वरित ५६ हजार ८३१ बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. बाधित जनावरांपैकी २५ हजार ७६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर लम्पी रोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या नुकसानीपोटी ११ हजार ३४४ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसानभरपाईपोटी ३० कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. राज्यात सर्व जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
पुणे जिल्ह्यात तातडीने केलेल्या लसीकरणामुळे जनावरांचा मृत्यू रोखण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. ‘संसर्ग सुरू झाल्यानंतर जलदगतीने लसीकरण सुरू करण्यात आले. त्यासाठी सरकारी वाहने उपलब्ध करून देण्यात आली. सुमारे दीड लाखाहून अधिक लशींची खरेदीही करण्यात आली. फिरत्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या ६३३ जनावरे बाधित असून त्यातील ३८ जनावरे चिंताजनक आहेत. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत ६३३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कमी मृत्यू पुणे जिल्ह्यात झाले आहेत,’ असे प्रसाद यांनी सांगितले. राज्यात सर्वाधिक जनावरे नगर जिल्ह्यात तर दुसऱ्या क्रमांकावरील जनावरे पुणे जिल्ह्यात आहेत. मात्र, पुणे जिल्हा मृत्युसंख्येत बाराव्या क्रमांकावर आहे, असल्याचेही त्यांनी सांगितले.
मृत्युमुखी पशुधनाची राज्यातील स्थिती
जिल्हा मृत्यूसंख्या
पुणे ६३३
बुलढाणा ४५१०
अहमदनगर २९२८
अमरावती २३९३
जळगाव २३३९
अकोला १४७०
सोलापूर १८२३
सातारा १०७९
सांगली ९०१
औरंगाबाद ८४५
जालना ६९६
वाशिम ६६६