Maharashtra| राज्यात १ कोटी गुरांना लम्पी प्रतिबंधक लसीकरणाचा डोस; ५ जिल्ह्यात लसीकरण पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 04:30 PM2022-10-05T16:30:24+5:302022-10-05T16:35:01+5:30
अकोला, जळगाव, कोल्हापूर, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे...
पुणे : लम्पीने राज्यात धुमाकूळ घातला असताना राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने तातडीने गुरांचे लसीकरण करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे साेमवारपर्यंत एक काेटी पाच लाख गुरांचे लसीकरण झाले. यात अकोला, जळगाव, कोल्हापूर, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे.
लम्पी हा गुरांमधील काेविड समजला जाताे. लवकर उपचार न मिळाल्यास गाय, बैल व वासरे दगावतात. लसीकरण केल्यास त्यांना धाेका संभवत नाही. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण एक काेटी पाच लाख पशुधनास मोफत लसीकरण केले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे ७५.४९ टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.
राज्यात ४८ हजार जनावरे बाधित
राज्यात आतापर्यंत ३१ जिल्ह्यांमधील एकूण २१५१ गावांमध्ये ४८ हजार ९५४ गुरे लम्पीने बाधित झाली आहेत. त्यापैकी २७ हजार ७९७ पशुधन उपचाराने बरे झाले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत.
राज्यात दाेन हजार बळी
महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात ३२६, अहमदनगर २०१, धुळे ३०, अकोला ३०८, पुणे १२१, लातूर १९, औरंगाबाद ६०, बीड ६, सातारा १४४, बुलडाणा २७०, अमरावती १६८, उस्मानाबाद ६, कोल्हापूर ९७, सांगली १९, यवतमाळ २, सोलापूर २२, वाशिम २८, नाशिक ७, जालना १२, पालघर २, ठाणे २४, नांदेड १७, नागपूर ५, हिंगोली १, रायगड ४, नंदुरबार १५ व वर्धा २ असे एकूण १९१६ गुरांचा मृत्यू झाला आहे.