आर्मी अधिकारी असल्याचं सांगितलं; अन् नोकरीच्या आमिषाने अनेक तरुणांना ५० लाखांना गंडवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 05:34 PM2021-07-06T17:34:17+5:302021-07-06T17:35:54+5:30
लॉकडाऊनचे कारण सांगत आरोपीने नातेवाईक, मित्रमंडळी, भटजी विना बंद खोलीत आतापर्यंत चार मुलींशी लग्न केले असून तो आणखी ५३ मुलींच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे.
बिबवेवाडी : आर्मी अधिकारी असल्याचे भासवून तरुणींशी जवळीक साधत आणि त्यांना लग्नाच्या बंधनात अडकवत होता. तसेच त्यांच्या ओळखीच्या नातेवाईकांमध्ये असलेल्या तरूण मुलांना आर्मीमध्ये नोकरी लावून देण्याच्या आमिषाने त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल करत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी बिबवेवाडी येथे राहत असलेल्या तरुणीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.
आरोपी योगेश दत्तू गायकवाड (वय २७ रा.मु.डोंगरगाव, ता.कन्नड जि.औरंगाबाद) व त्याचा साथीदार संजय ज्ञानबा शिंदे (वय ३८, रा. केडगाव ता.जि.अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
बिबवेवाडी पोलिसांनी आरोपीकडून आर्मीचे कपडे, खोटे शिक्के, बनावट बिल्ले, टी शर्ट वेगवेगळ्या प्रकारच्या वापरल्या जाणाऱ्या टोप्या तसेच खोटी जॉइनिंग लेटर्स व एक चारचाकी गाडी,दोन दुचाकी गाड्या असा एकूण ५,४१,१००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बिबवेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी अणि तिची आई बिबवेवाडी येथील एका हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी करण्यासाठी आल्या होत्या. त्या हॉस्पिटलच्या बाहेर रिक्षाची वाट बघत असताना पँटच्या मागील खिशातून आधारकार्ड पडल्याचे फिर्यादीने पाहिल्यामुळे ते परत देण्यासाठी आरोपी संजय शिंदेला आवाज दिला. यानंतर आरोपीने फिर्यादीशी जवळीक साधत आर्मी अधिकारी असल्याचे सांगितले. त्याच्या जवळील आर्मीच्या पोशाखातील फोटो व बनावट ओळखपत्र दाखवून फिर्यादी तरुणी व तिच्या आई वडिलांचा विश्वास संपादन करत तरुणीशी लग्न केले.
आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने लॉकडाऊनचे कारण सांगत नातेवाईक, मित्रमंडळी, भटजी विना बंद खोलीत आतापर्यंत चार मुलींशी लग्न केले आहे. तसेच एका पत्नीला त्याच्यापासून 2 अपत्ये आहे. तो आणखी ५३ मुलींच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर आरोपी योगेश गायकवाडने आर्मीमध्ये मोठी भरती निघाल्याचे सांगत फिर्यादीच्या भावाला आर्मीमध्ये नोकरी लावून देतो म्हणून फिर्यादीच्या वडिलांकडून दोन लाख रुपये घेतले. तसेच फिर्यादीच्या गावातील नातेवाईकांचा व गावाबाहेरील तरुणांचा विश्वास संपादन करत त्यांना आर्मीमध्ये नोकरी लावून देतो असे सांगून त्यांच्याकडून पन्नास लाख रुपये घेतले. तसेच फिर्यादीच्या भावाचे व इतर काहीजणांची खोटे जॉईनिग लेटर दाखवत फसवणूक करून विश्वासघात केला.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वानवडी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे, बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, व गुन्हे पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर,पोलीस नाईक तात्या देवकते, पोलीस अंमलदार अमित पुजारी, सतीश मोरे, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी, अतुल महांगडे, अमोल शितोळे, दिपक लोधा, राहुल कोठावळे यांनी केली आहे.