कस्टमचा जप्त माल कमी किमतीत देण्याचे आमिष; पुण्यातील व्यापाऱ्यांना ३०० कोटींना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 09:24 AM2023-09-06T09:24:56+5:302023-09-06T09:25:14+5:30

नवी मुंबईच्या एका कुटुंबाने पुण्यातील अनेक व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार

Lure of giving customs seized goods at low price; 300 crore to the traders in Pune | कस्टमचा जप्त माल कमी किमतीत देण्याचे आमिष; पुण्यातील व्यापाऱ्यांना ३०० कोटींना गंडा

कस्टमचा जप्त माल कमी किमतीत देण्याचे आमिष; पुण्यातील व्यापाऱ्यांना ३०० कोटींना गंडा

googlenewsNext

पुणे : सीमा शुल्क विभागाने जप्त केलेला माल मिळाल्याचे केंद्रीय संस्थांचे बनावट ई-मेल दाखवून तो माल कमी किमतीत देतो, असे सांगून नवी मुंबईच्या एका कुटुंबाने पुण्यातील अनेक व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे ३०० कोटींची फसवणूक असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत मनोज सुरेश लुंकड (वय ४७, रा. मार्केट यार्ड) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोहम इम्पेक्स प्रा. लि., दशरथ मच्छिंद्र कोकरे (वय ३९), वर्षा दशरथ कोकरे, महेश रामभाऊ बंडगर आणि सागर रामभाऊ बंडगर (सर्व रा. खारघर, नवी मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१६ ते २०१८ मध्ये घडला होता. फिर्यादी मनोज लुंकड हे सुपारी, काळी मिरी, प्लास्टिक दाणा अशा वस्तूंच्या आयात-निर्यातीचा व्यापार करतात. त्यांच्या एका मित्राने दशरथ कोकरे हे सीमा शुल्क विभागाचे जप्त केलेला माल कमी किमतीमध्ये घेतात. तुम्हाला जप्त केलेला माल पाहिजे असेल, तर तुम्ही गुंतवणूक करा. त्या गुंतवणुकीवर ५० ते ६० टक्के नफा देतो, असे सांगितले. त्यानंतर कोकरे व बंडगर यांनी त्यांना न्हावा शिवा येथे अनेक प्रकारच्या वस्तू दाखविल्या. त्यात ६० टक्के कमी किमतीत मिळतात, असे सांगितले.

केंद्रीय अर्थ खात्याने सीमा शुल्क विभागाला सोहम इम्पेक्स कंपनीला माल देण्याबाबतचा ई-मेल दाखवला. तसेच केंद्रीय आरोग्य विभागाचाही असाच ई-मेल दाखवला. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी त्यांच्याकडे ६६ कोटी ३३ लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर त्यांनी कोणताही परतावा दिला नाही. कोकरे व इतरांनी अशा प्रकारे अनेक जणांची फसवणूक केल्याची माहिती फिर्यादी यांना मिळाली. फिर्यादींनी एनआयसीकडे चौकशी केली. तेव्हा हे भारत सरकारच्या नावाने बनावट ई-मेल असल्याचे त्यांनी सांगितले. अशाच प्रकारे कोकरे याने अनेकांची कोट्यवधीची फसवणूक केली आहे. एक वर्षानंतर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रुईकर तपास करीत आहेत.

Web Title: Lure of giving customs seized goods at low price; 300 crore to the traders in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.