Cyber Crime: शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष; पुणेकरांना एक कोटीचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 19:15 IST2025-03-11T19:15:06+5:302025-03-11T19:15:49+5:30

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिष, काळ्या पैशाच्या व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आल्याचे सांगून, सायबर चोरट्यांनी तक्रारदारांची एकूण एक कोटी रुपयांची फसवणूक केली

Lure of investing in the stock market Pune residents cheated of Rs. 1 crore | Cyber Crime: शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष; पुणेकरांना एक कोटीचा गंडा

Cyber Crime: शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष; पुणेकरांना एक कोटीचा गंडा

पुणे : नवीन गॅस जोड देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी आंबेगाव परिसरातील एका तरुणाची चार लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने तसेच काळ्या पैशाच्या व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आल्याचे सांगून, वेगवेगळ्या घटनांमध्ये सायबर चोरट्यांनी तक्रारदारांची एकूण एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

गॅस कनेक्शन देण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. गॅस कंपनीकडून नवीन गॅस जोड देण्यात येणार आहे. गॅस जोड नोंदणीसाठी वैयक्तिक माहिती द्यावी लागेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्याला जाळ्यात ओढले. चोरट्यांनी तक्रारदार तरुणाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने चार लाख ४० हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेेले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने तपास करत आहेत.

दरम्यान, सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत तक्रारदारांची एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करण्याचे दोन वेगवेगळे गुन्हे वाघोली पोलिस ठाण्यात दाखल झाले. पहिल्या घटनेत वाघोली भागातील एकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ३९ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. याबाबत एका ४८ वर्षीय तक्रारदाराने वाघोली ठाण्यात फिर्याद दिली आहे. अशाच प्रकारे आणखी एकाची ३४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजीतवाड तपास करीत आहेत.

काळ्या पैशाच्या व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आला असून, या प्रकरणात पोलिस कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी हडपसर भागातील एकाची ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी तक्रारदाराला धमकावून वेळोवेळी पैसे घेतले. हडपसर भागातील एकाची चोरट्यांनी बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी करून चोरट्यांनी दोन लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करत आहेत.

Web Title: Lure of investing in the stock market Pune residents cheated of Rs. 1 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.