डीएसकेंच्या जप्त आलिशान गाड्यांचा होणार लवकरच लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:05 PM2018-06-21T14:05:29+5:302018-06-21T14:05:29+5:30
मालमत्तेबरोबर जप्त केलेल्या आलिशान गाड्या या नाशवंत, त्या डी़. एस़. कुलकर्णी यांच्याच मालकीच्या आणि त्यांच्यावर कोणाचा क्लेम नसल्याने त्यांचा लिलाव लवकरात लवकर करण्यास परवानगी द्यावी, असा विनंती अर्ज करण्यात आला आहे़.
पुणे : बांधकाम व्यावसायिक डी़. एस़. कुलकर्णी यांच्या पोलिसांनी जप्त केलेल्या आलिशान गाड्यांचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे़. त्यासाठी जिल्हा न्यायालयातील विशेष न्यायालयात जिल्हा प्रशासनाच्या वतीने अर्ज करण्यात आला आहे़.
गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़. एस़. कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर त्यांच्या एकूण १६ आलिशान मोटारी व एक स्पोटर्स बाईक जप्त करण्यात आली आहे़. त्यात पोर्श, बीएमडब्लू आणि एमव्ही आॅगस्टा सुपरबाईक अशा महागड्या गाड्यांचा समावेश आहे़. या गाड्या जप्त करुन सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आल्या आहेत़.
याबाबत मावळ प्रांताधिकारी सुभाष भागडे म्हणाले, कुलकर्णी व त्यांच्या कंपन्यांच्या नावावर असलेल्या २४६ मालमत्ता व १७ वाहने जप्त करण्यात आली आहेत़. शासनाने तशी अधिसूचना काढली आहे़. त्याबाबतचे शपथपत्र विशेष न्यायाधीश आऱ. एऩ. सरदेसाई यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले आहे़ न्यायालयाने या मालमत्तांच्या लिलावाला मान्यता दिल्यानंतर त्यांचे मुल्यनिर्धारित करण्यात येईल़. मालमत्तेबरोबर जप्त केलेल्या आलिशान गाड्या या नाशवंत, त्या डी़. एस़. कुलकर्णी यांच्याच मालकीच्या आणि त्यांच्यावर कोणाचा क्लेम नसल्याने त्यांचा लिलाव लवकरात लवकर करण्यास परवानगी द्यावी, असा विनंती अर्ज करण्यात आला आहे़. त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे़.
डीएसके यांच्या मालमत्तेवर ज्यांचा बोजा आहे, अशा सर्वांना त्यांचा पैसा परत मिळू शकतो, त्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे आपला क्लेम सादर करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले़.
दरम्यान, कुलकर्णी यांनी महाराष्ट्र बँकेचे ३१ कोटी ६५ लाख रुपये थकविले आहेत़. त्याच्या वसुलीसाठी तारण ठेवण्यात आलेली धायरी येथील डीएसके विश्वमधील गहाण मालमत्ता बँकेने लिलावात काढली आहे़. तशी जाहिरात बँकेच्या वतीने वृत्तपत्रात देण्यात आली आहे़. बँकेने या जागेचा १ जून २०१८ रोजी प्रत्यक्ष ताबा घेतला आहे़. लिलावात बोली लावण्यासाठी ८६ लाख रुपये रक्कम भरावे लागणार आहे. २१ जुलैपर्यंत लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज भरता येणार आहेत.२३ जुलैला डीएसके प्रकल्पातील मालमत्तांचा लिलाव होणार आहे, असे या जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे़.