एम ४ कार्बाईन : एका मिनिटात सुमारे ९५० राऊंड फायर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 03:02 AM2018-06-10T03:02:39+5:302018-06-10T03:02:39+5:30
कमी रुंदीची आणि वजनाने हलकी असलेली एम ४ कार्बाईन ही रायफल तिच्या रचनेमुळे शत्रूसाठी कर्दनकाळच ठरू शकते. नुकत्याच एका प्रकरणात या शस्त्राचा उल्लेख झाला. त्यामुळे हे शस्त्र नेमके आहे तरी काय, याबाबत अनेकांना उत्सुकता निर्माण झाली.
- सनिल गाडेकर
पुणे : कमी रुंदीची आणि वजनाने हलकी असलेली एम ४ कार्बाईन ही रायफल तिच्या रचनेमुळे शत्रूसाठी कर्दनकाळच ठरू शकते. नुकत्याच एका प्रकरणात या शस्त्राचा उल्लेख झाला. त्यामुळे हे शस्त्र नेमके आहे तरी काय, याबाबत अनेकांना उत्सुकता निर्माण झाली.
या रायफलमध्ये बॅरेलचे तापमान आणि सभोवतालची परिस्थितीनुसार एका मिनिटांत ७०० ते ९५० राऊंड फायर करण्याची क्षमता आहे. त्यामुळे क्षणार्धात शत्रूच्या चिंधड्या उडविण्याची ताकद या रायफलमधे असल्याचे स्पष्ट होते. सुमारे ३ किलो वजन असलेल्या या रायफलची लांबी ३३ इंच, तर बॅरेलची लांबी १४.४ इंच आहे. पण, तिला लावण्यात येणाऱ्या इतर यंत्रांमुळे तिची लांबी कमीजास्त होते. तर, कॅलिबर : ५.५६७४५ मिमीचे आहे. एम ४ कार्बाईन रायफल ५.५६४५ नाटो कॅलिबर क्लासच्या एम १६ ए २च्या प्राणघातक रायफलचा
एक अधिक संक्षिप्त आणि हलका प्रकार आहे.
गॅस आॅपरेट, इअर कोल्ड, लहान नळी, संकुचित स्टॉक आणि वाहून नेण्यासाठी काही पार्ट वेगळे करण्याची सोय, इनबिल्ड अक्सेसरी रेल, हाताळायला सोपी, विस्तारित रेंज, दिवसा किंवा रात्री सुमारे ६०० मीटरपर्यंतचे लक्ष्य ठिपण्याची क्षमता अशी या रायफलची वैशिष्ट्ये. अचूक आणि प्राणघातक हल्ला करण्यासाठी एकच व्यक्ती ही रायफल चालवू शकते. भारतात ही रायफल गतिशीलता दल, सैन्याचे विशेष आॅपरेशने, उंचीवर असलेली ठिकाणे आदी ठिकाणी वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे सैनिकाला जास्त वजन पेलावे लागणार नाही. या रायफलमधून जरी सुमारे ९५० राऊंट फायर होत असले तरी तेवढे राऊंट बरोबर ठेवणे प्रत्येक वेळी शक्य नाही, अशी माहिती निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर यांनी दिली.
एम ४ कार्बाईनची रचना सर्वांत प्रथम अमेरिकेत झाली. त्यानंतर जगभरातील विविध शस्त्रनिर्मात्यांनी तीत गरजेनुसार वेळोवेळी सुधारणा केल्या आहेत. कोलंबस, कोसोवो युद्ध, अफगाणिस्तान युद्ध, इराक, सीरियन गृहयुद्ध, इराकी गृहयुद्ध, येमेनी गृहयुद्ध इत्यादींसह अनेक युद्धांत या रायफलचा वापर करण्यात आला आहे. युनायटेड स्टेटमधील उदारमतवादी तोफा कायद्यांमुळे तेथील काही राज्यांमध्ये ही रायफल विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्या ठिकाणी तिच्या स्टॉक किटची किंमत ५२ हजार रुपये आहे.