मासाळवाडीकरांचा बाणा
By admin | Published: May 17, 2014 05:36 AM2014-05-17T05:36:57+5:302014-05-17T05:36:57+5:30
पाण्यासाठी आंदोलन करणार्या मासाळवाडी (ता. बारामती) या गावातील ग्रामस्थांनी मतदानाद्वारे आपला उद्रेक दाखवून दिला आहे.
बारामती : पाण्यासाठी आंदोलन करणार्या मासाळवाडी (ता. बारामती) या गावातील ग्रामस्थांनी मतदानाद्वारे आपला उद्रेक दाखवून दिला आहे. महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना या गावात १५ मते सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा जास्त मिळाली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक प्रचार संपल्यानंतर धमकावल्याच्या कथीत प्रकारानंतर या गावाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. दि. १६ एप्रिल २०१४ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अजित पवार यांनी मासाळवाडी गावात ग्रामस्थांची बैठक घेतली. या बैठकीत गावातील एका तरुणाने पाण्याचा प्रश्न कधी सुटणार, अशी थेट विचारणा केली होती. २००६ मध्ये आश्वासन दिले. २०१४ उजाडले तरी पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. आता नक्की तारीख द्या, पाणी कधी देणार. त्यावरून शाब्दिक वाद झाला होता. अजित पवार यांच्या कथीत धमकीची ‘व्हिडिओ क्लिप’ प्रसार माध्यमांनी उचलून धरली. सर्वच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मासाळवाडी गावात धाव घेतली. त्याचे वृत्तांकन केले. त्यानंतर गावात कोणी बोलू नये, यासाठी ग्रामदैवताचा गुलाल उचलायला लावायचा प्रकार घडला. त्यामुळे आठवडाभर मासाळवाडी गावातील ग्रामस्थ दहशतीच्या छायेत होते. या प्रकरणी न्यायालयात फिर्याद देण्यात आली आहे. अजित पवार यांनी आपण त्या गावात गेलोच नव्हतो, तर धमकी देण्याचा प्रश्नच नाही, असा खुलासा केला होता. मात्र, ग्रामस्थांनी पवार यांच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चाच्या निवेदनात पवार गावात आले होते. मात्र, ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा केली. धमकी दिलेली नाही, असा खुलासा ग्रामस्थांनी केला होता. या सर्व घडामोडीनंतर मासाळवाडी गावात झालेल्या मतदानाकडे लक्ष होते. प्रचाराच्या काळात या गावात जाता आले नाही, असे असताना देखील सुप्रिया सुळे पेक्षा जास्तच मते मिळतील, असा दावा महायुतीचे महादेव जानकर यांनी केला होता. त्यानुसार आज झालेल्या मतमोजणीत मासाळवाडी गावात सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा जानकर यांना १५ मते जादा मिळाली आहेत.