मावळात चोरांचा धुमाकूळ
By admin | Published: February 21, 2017 02:32 AM2017-02-21T02:32:37+5:302017-02-21T02:32:37+5:30
मावळ तालुक्यात ठिकठिकाणी चोरट्यांचा धूमाकुळ सुरू असल्याच्या बातम्या येत असताना पोलीस या संदर्भात फारसे गंभीर
कामशेत : मावळ तालुक्यात ठिकठिकाणी चोरट्यांचा धूमाकुळ सुरू असल्याच्या बातम्या येत असताना पोलीस या संदर्भात फारसे गंभीर नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. अनेक गावांत चोऱ्या टाळण्यासाठी आणि चोरट्यांना पकडण्यासाठी ग्रामस्थांनी गस्त सुरू केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मावळात मोठ्या प्रमाणात चोर येत असल्याच्या, तसेच या चोरांच्या अंगावर काळे आॅईल लावले असल्याचे मेसेज व्हॉट्स अॅपवर फिरत आहेत. यात कोणतेच तथ्य नाही असे पोलिसांकडून सांगितले जात असतानाच रविवारी कान्हे नायगाव, साई, वाऊंड, पारवडी या गावात चोर आल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
ग्रामीण भागात चोरांचा धुमाकूळ सुरु झाला असल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी लोणावळ्यात चोरी करणाऱ्या चोरांना वडगाव येथे व पवन मावळातील एका गावच्या हद्दीत दोन चोरांना पकडण्यात आले होते. मावळातील प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातील गावांमध्येही चोऱ्या होऊ लागल्या असून याची पोलिसांना कोणतीच माहिती नाही, अशी तक्रार नागरिक करीत आहेत.
अनेक भागात चोर आल्याच्या घटनांमुळे गावातील तरुणांनी गस्त घालणे सुरू केले आहे. काही संशयित व्यक्ती आजूबाजूला आढळल्यास याची माहिती पोलिसांना दिली जाते. पण पोलीस येत नसल्याची तक्रार तरुण करीत आहेत. तर पोलीस संबंधित गावात जाऊन पोहोचल्यास तेथे कोणीच आढळत नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. काही दिवसांपासून लोणावळा परिसरात अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. रोज कोठे ना कोठे चोरी झाल्याची बातमी येतच आहे. (वार्ताहर)
पोलिसांचा उशीर : नागरिकांची नाराजी
४मावळातील अनेक ठिकाणी चोरीच्या बहाण्याने काही चोर फिरत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या धामधुमीत पोलीस आहेत. त्यामुळे माहिती कळवूनही पोलिसांना घटनास्थळी पोहचण्यासाठी वेळ लागत आहे. मात्र, याबाबत नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.