मदनवाडी तलाव कोरडाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:25 PM2018-08-29T23:25:51+5:302018-08-29T23:26:23+5:30
सिद्धेश्वर निंबोडीसह परिसरातील गावे तहानलेली : खडकवासल्याचे आवर्तन सोडण्याची मागणी
पारवडी : सिद्धेश्वर निंबोडी (ता. बारामती) येथील बारामती, इंदापूर या तालुक्यांना वरदान ठरलेला मदनवाडी तलाव आठ महिन्यांपासून कोरडाच आहे. परिणामी, सिद्धेश्वर निंबोडीसह परिसरातील गावे ऐन पावसाळ्यातही तहानलेलीच आहेत. त्यामुळे या भागाला पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करावी लागत आहे.
सन १९७२मध्ये महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळात प्रशासनाने १७० हेक्टर क्षेत्रावर हा तलाव बांधला. तलावात पावसाबरोबरच पारवडीमधून वाहणारे ओढे तसेच खडकवासला कालव्याचे आवर्तन यांमुळे पाणीसाठी होतो. वितरिका ३६ तसेच ४० यांच्या साह्याने खडकावासला कालव्यातून पाणी सोडले जाते. आवश्यक पाणीसाठा झाल्यानंतर इंदापूर तालुक्यातील मदनवाडी, वीरवाडी, सिद्धेश्वर निंबोडी परिसरातील पाणीपुरवठा योजना, उपसा सिंचन तसेच वितरिकेच्या माध्यमातून पाणी देण्यात येते. परंतु, चार वर्षांपासून पावसाचा अनियमितपणा तसेच खडकवासला कालव्याचे आवर्तन वेळोवेळी न मिळाल्याने सध्या हा तलाव कोरडा ठणठणीतच राहिला आहे. आठ दिवसांत खडकवासल्यातून पाणी न सोडल्यास गाव सोडून जावे लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई
चार वर्षांपासून मदनवाडी तलाव कोरडाच आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन दिवसांत पंचायत समितीच्या माध्यमातून पाण्याचा टँकर मागविणार आहे. तसेच, पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी ग्रामसभा घेऊन बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील तसेच खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना खडकवासला कालव्याचे आवर्तन सोडण्याबाबत लेखी निवेदन दिले आहे.
- मनीषा फडतरे, सरपंच, सिद्धेश्वर निंबोडी
मदनवाडी तलावाच्या आधारावर गेली कित्येक वर्षे शेतीव्यवसाय करीत होतो; परंतु तलावातील पाणीसाठ्याच्या अनियमितपणामुळे शेतीव्यवसाय अडचणीत आला आहे. तीन वर्षांपासून बारामती औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरातील खासगी कारखान्यात कामाला जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तीन किलोमीटर अंतरावर जावे लागते. येत्या आठ दिवसांत तलावात खडकवासला कालव्याचे आवर्तन सोडून आवश्यक पाणीसाठा न केल्यास ग्रामस्थांना गाव सोडून जावे लागेल.
- शरद सवाणे,
ग्रामस्थ, सिद्धेश्वर निंबोडी
मदनवाडी तलावात आवश्यक पाणीसाठा उपलब्ध करून देण्याबाबत सिद्धेश्वर निंबोडी ग्रामपंचायत कार्यालयाकडून निवेदन आलेले आहे. त्यांचा संबंधित विभागाशी बोलणे तसेच पाठपुरावा केला आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात खडकवासला कालव्याचे आवर्तन मिळण्याच्या दृष्टीने निर्णय होईल.
-हनुमंत पाटील, तहसलीदार, बारामती तालुका