लॉकडाऊनमध्ये 'मधु' येथे अन् 'चंद्र' तिथे, नवीनच लग्न झालेल्या जोडप्याची वेगळीच व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 11:14 AM2020-04-11T11:14:09+5:302020-04-11T11:15:37+5:30
दोन वेळा पुण्याकडे निघालेली गाडी वाटेत पोलिसांनी अडवून तिला पुन्हा घरी पाठवण्यात आले होते..
युगंधर ताजणे-
पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश संकटात सापडला आहे. सध्या राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. अशावेळी शहर सोडून, जिल्हा बदल करण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. संचारबंदीचा आदेश असल्याने त्याचा फटका अनेकांना बसला आहे. यात अवघ्या काही दिवसांपूर्वी लग्न झालेल्या युवकाला वेगळ्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. लग्न झाल्यानंतर काही दिवसांसाठी माहेरी गेलेल्या नववधूला अचानक लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे माहेरीच राहावे लागले आहे. लग्न झाले, पाडव्याच्या मुहूर्तावर गावी गेलेल्या पत्नीला पुन्हा घरी आणण्यासाठी पतीची धडपड सुरू आहे.
खराडी येथील एका कंपनीत आशुतोष (नाव बदलले आहे) कामाला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याचे लग्न झाले. त्यानंतर ठरलेल्या रितीरिवाजानुसार पत्नी धारवाड (कर्नाटक) या आपल्या माहेरी गेली.कोरोनाचा वाढता संसर्ग पुढे आपल्यासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे याची त्यावेळी आशुतोषला जराही कल्पना नव्हती. तोपर्यत केवळ शहरात नाकाबंदी, दुकाने बंद, रस्त्यावर नेहमीपेक्षा रहदारी कमी याचा अनुभव त्याला आला होता. पत्नी माहेरहुन आलेल्या गाडीने गेल्याने त्याला तिच्या प्रवासाची काळजी नव्हती. पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यत लॉकडाऊनची घोषणा केली. यात सार्वजनिक, खासगी वाहतुकीस पूर्णत: बंदी घालण्यात आली होती. तसेच नागरिकांना संचारबंदीचे आदेश देण्यात आले होते. केवळ अत्यावश्यक सेवेत सहभागी असणा?्या अधिकारी, कर्मचारी यांना विशेष सवलत देण्यात आली होती. लॉकडाऊन असला तरी काही दिवसांनी वाहतूक सुरू होईल असा अंदाज आशुतोषचा होता. मात्र तो साफ चुकीचा असल्याचे बऱ्याच दिवसांनी लक्षात आले. त्याने धारवाडला पत्नीला फोन करून पुण्यातील परिस्थितीची कल्पना दिली. थोडे दिवस वाट पहावी, परिस्थितीचा अंदाज पाहून निर्णय घ्यावा असे त्याने तिला सुचवले. धारवाड वरून दोन वेळा पुण्याकडे निघालेली गाडी वाटेत पोलिसांनी अडवून तिला पुन्हा घरी पाठवण्यात आले होते.
एव्हाना आशुतोषने आपल्या मित्र मंडळींना संपर्क करून काही मदत मिळते का यासाठी प्रयत्न सुरू केले. ओळख काढून पोलिसांना विचारून पत्नीला पुन्हा सासरी कसे आणता येईल यासाठी तो सतत धडपडत होता. मात्र त्यात त्याला काही यश येत नव्हते. दरम्यान लॉकडाऊन संपल्यानंतर पत्नीला घरी आणता येणं शक्य आहे. असे त्याला सांगितले. परंतु सध्याची परिस्थिती पाहता 14 एप्रिलचे लॉकडाऊन मागे घेण्यात येईल अशी पावले सरकारकडून उचलली जाण्याची शक्यता कमी आहे. दोन दिवसांपासून लॉकडाऊन मध्ये वाढ केली जाणार असून तो कदाचित 30 एप्रिल पर्यत असेल असा अंदाज प्रशासनाचा आहे. त्यामुळे पत्नीला घरी कसे घेऊन यावे ? या प्रश्नाने पतीची डोकेदुखी आणखी वाढली आहे. गोष्ट केवळ केवळ आशुतोषची नसून वेगवेगळ्या कारणांमुळे गावी, शहरात अडकून पडलेल्या अनेकांची आहे. महत्वाच्या कामासाठी गेल्यावर त्याठिकाणी लॉकडाऊन झाल्याचे कळले आणि त्याच ठिकाणी अडकून पडल्याची काही उदाहरणे आहेत. यासगळ्यात किमान आम्हाला आमच्या घरी पुन्हा सुखरुप येऊ द्या. अशी विनंती त्या व्यक्तींनी केली आहे. यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचा समावेश आहे.
..................
* माटुंग्याला अडकून पडलो आहोत...
आईच्या अंतिम विधीसाठी आम्ही सगळे पुण्यावरून मुंबईला आलो होतो. सध्या बहिणीच्या घरी आहोत. सगळे विधी पार पडले. आणि राज्यात लॉकडाऊन झाल्याची न्यूज टीव्हीवर पाहिली. आता पुन्हा पुण्याला कसे जायचे हा प्रश्न आमच्या समोर आहे. आम्ही दोघे ज्येष्ठ नागरिक आहोत. आमच्या समवेत आमची मुलगी आहे. पोलिसांना विचारले तर ते अर्ज करा. आॅनलाइन अर्ज आहे भरून द्या. गाडीची व्यवस्था करा. असे सांगत आहे. सध्या सगळेच बंद असल्याने कुठून काही मदत मिळेल याची शक्यता देखील कमी आहे. घर अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे काळजी अधिक आहे. पोलिसांनी सांगितलेल्या सर्व परवानगी घेऊन देखील अद्याप आम्हाला पुण्याला येणं शक्य झालेले नाही. पुण्याकडे येताना वाटेत पुन्हा पोलिसांनी अडवले तर अशावेळी काय करणार ? पोलीसांकडून आमच्या सारख्या अडकून पडलेल्या व्यक्तीची दखल घेतली जावी. अशी विनंती पौड येथे राहणा?्या मेधा काळे यांनी केली आहे.