ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिकांनी उलगडले पुलंच्या विनोदामागचे अंतरंग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 09:35 PM2018-11-08T21:35:19+5:302018-11-08T21:39:06+5:30
मनुष्याच्या आयुष्यात विनोद नसेल तर जीवन निरस, कंटाळवाणे होऊन जाते. पुलं हा 'खेळीया' नव्हता तर माणसं जमवणारा 'मेळीया' होता.
पुणे : मनुष्याच्या आयुष्यात विनोद नसेल तर जीवन निरस, कंटाळवाणे होऊन जाते. पुलं हा 'खेळीया' नव्हता तर माणसं जमवणारा 'मेळीया' होता. पुलंनी हसविण्याबरोबरच लोकांना रडविले, विचार आणि अंतर्मुख करायला लावले. पुलंच्या विनोदाने सामान्य माणसांशी हस्तांदोलन केले. विनोदाच्या अस्त्राचा त्यांनी शस्त्र म्हणून वापर केला अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी पुलंच्या विनोदामागचे अंतरंग उलगडले.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या पु.ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पु.ल परिवार आणि आशय सांस्कृतिक च्या वतीने आयोजित 'ग्लोबल पुलोत्सव 'चे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. या प्रसंगी महापौर मुक्ता टिळक, नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ अरुणा ढेरे, तसेच मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, पुण्यभूषण फाउंडेशनचे डॉ सतीश देसाई, आशय सांस्कृतिक चे सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, गजेंद्र पवार, कृष्णकुमार गोयल, , मयूर वैद्य आणि नायनीश देशपांडे उपस्थित होते. यावेळी 'ग्लोबल पुलोत्सव' च्या लोगोचे अनावरण करण्यात आले. चौदा वर्षांच्या पुलोत्सवावर ' मागोवा' या साकारल्या जात असलेल्या लघुपट निर्मितीचा शुभारंभ डॉ. ढेरे यांच्या हस्ते करण्यात आला.
माझ्या पहिल्या वहिल्या पुस्तकाला पुलंची प्रस्तावना होती. मला त्यांचा प्रसादस्पर्श लाभला. त्या बळावर माझी साठ वर्षांची वाटचाल झाली असे सांगून मधु मंगेश कर्णिक म्हणाले, महाराष्ट्राला विनोद तसा नवीन नाही भारूड अभंग यातून उपरोधिक भाष्य अनुभवले आहे. कोल्हटकर, चि. वि. जोशी यांनी विनोदातून लोकांना हसविले, पण पुलंच्या विनोदाने सामान्य माणसांशी हस्तांदोलन केले. पुलंनी महाराष्ट्राला विनोदाचा प्रसाद दिला त्यामागे त्यांची एक भूमिका होती त्यांनी हसवलं, रडवलं आणि अंतर्मुखही केले. कारण विनोदाचे देखील एक शास्त्र आहे. पुलंच्या विनोदात, स्वभावात सामाजिक मन दडले होते. विनोदाच्या पलीकडे जाऊन पुलंना ओळखण्याची गरज आहे. ते विदुषी नाहीत विचारवंत आहेत, मात्र त्यांच्या विनोदाची चिकित्सा झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या, पुलंनी अवघ्या महाराष्ट्राला समृद्ध केले. पुलंनी रसिकांना अभिरुची संपन्नता दिली. मराठी माणसाची नजर त्यांनी भारतातील कलावंता पर्यंत पोहोचविली. वाड्मयीन चळवळी, युद्ध नाही, कधी कला व वाड्मयबाह्य गोष्टी केल्या नाहीत तरीही ते कलाजीवनाचे दिग्दर्शक ठरले. ओबडधोबड दगड असलेल्या मराठी माणसाला पुलंनी हसवायला शिकविले दोन्ही हात पसरून कलेच्या सर्व गोष्टीचे त्यांनी भरभरून स्वागत केले. निरमत्सरी, उदारमतवादी जीवन जगणे फार कमी लोकांना जमते, त्यातील पु.ल एकमेव होते. पुलंच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती मुक्ता टिळक यांनी दिली. त्या म्हणाल्या, पुलंच्या मालती माधव या निवासस्थानी पुलंच्या जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ असा नीलफलक लावण्यात आला आहे. चित्रपट, साहित्य, संगीत या पैकी एका क्षेत्रासाठी पुलं देशपांडे पुरस्कार दिला जाणार आहे. ही एक सांस्कृतिक चळवळ आहे ती पुढे नेणे आपली जबाबदारी असल्यामुळे पुलोत्सवाला महापालिकेतर्फे 3 लाख रुपये दिले जातील. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल.
कोकण साहित्य परिषद ज्या व्यक्तीला अध्यक्षपद देते तोच साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो अशी मिश्कील टिप्पणी मधु मंगेश कर्णिक यांनी केली. साहित्य संमेलन निवडणुकीवरही त्यांनी ताशेरे ओढले. बँक, पतपेढी, साखर कारखान्यांची निवडणूक होऊ द्या साहित्य संमेलन अध्ययक्षाची कसली निवडणूक घेता? लता मंगेशकर की किशोरी आमोणकर किंवा भीमसेन जोशी की कुमार गंधर्व हे मतदान घेऊन कसे ठरवणार? साहित्य संमेलनाचा अध्यक्ष सन्मानानेच निवडला जायला हवा. साहित्य संमेलन हा शारदेचा देव्हारा आहे. तीस वर्षे संमेलन पाहतो आहे आज माझ्या मनासारखे संमेलन होणार आहे याचा आनन्द आहे.एका शारदेच्या देव्हारयात सात्विक सरस्वतीच प्रतिष्ठापना झाली असल्याचे ते म्हणाले.