मधुकर नलावडे यांना ‘फिदाभाई कुरेशी’ पुरस्कार प्रदान
By admin | Published: May 8, 2017 03:21 AM2017-05-08T03:21:05+5:302017-05-08T03:21:05+5:30
राष्ट्रीय व राज्यस्तरावर कबड्डीमध्ये खेळाडू आणि संघटक म्हणून आपला एक वेगळा दबदबा निर्माण करणारे फिदाभाई कुरेशी यांच्या नावाने
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राष्ट्रीय व राज्यस्तरावर कबड्डीमध्ये खेळाडू आणि संघटक म्हणून आपला एक वेगळा दबदबा निर्माण करणारे फिदाभाई कुरेशी यांच्या नावाने जागृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणार पुरस्कार यावर्षी कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष मधुकर नलावडे यांना त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते प्रदान केले.
या वेळी मिसाळ म्हणाल्या, ‘‘ज्या व्यक्तींच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जात आहे त्या व्यक्तीमध्ये भयंकर जिद्द व चिकाटी होती. एखादे काम हाती घेतले, की ते पूर्ण केल्याशिवाय ते थांबत नसे. त्यांच्या जाण्याने कबड्डी क्षेत्राची मोठी पोकळी भरून निघणार नाही. परंतु त्यांनी जी शिकवण दिली आहे त्याचा फायदा सर्वांनी घ्यावा व चांगले खेळाडू, प्रशिक्षक व संघटक तयार व्हावे, यांची इच्छा कबड्डी आॅलिंपिकमध्ये जावी अशी होती. त्या पद्धतीने
आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.’’
पुरस्कार्थी मधुकर नलावडे पुरस्काराला उत्तर देताना म्हणाले, ‘‘आज जो काही मी आहे तो फक्त फिदाभार्इंमुळेच आहे. त्यांनी मला लढायला शिकवले. त्या महान व्यक्तीच्या नावाने मला पुरस्कार मिळाला, हे मी माझे भाग्यच समजतो. खेळाडूंनी चांगले खेळावे, व्यायाम करावा व निरोगी राहावे, असे फिदाभार्इंना नेहमीच वाटायचे. त्यामुळे आपण सर्वांनी काळाची गरज ओळखून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.’’ त्याप्रसंगी सृष्टी ताटे, सायली हणमघर, चैताली मसुरकर, लावण्या गवळी व मधुरा गायकवाड यांना रोख एक रुपये शिष्यवृत्ती व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अंजली मुळे,
सिद्धी पोळ, जागृती सुरवसे,
ऋतिका होनमाने यांना गुणवंत
खेळाडू म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बाबूराव चांदेरे यांनी भूषविले. या वेळी शांताराम जाधव, अजय खेडेकर, आरती कोंढरे, रघुनाथ गौडा, कमलताई व्यवहारे, संदेश जाधव, योगेश यादव, राजेंद्र आंदेकर पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला फिदाभार्इंचे कुटुंबीय, नलावडे परिवार, हितचिंतक, जागृती प्रतिष्ठानचे खेळाडू व पालक व सर्व कबड्डीचे जाणकार मंडळी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत प्रतिष्ठानच्या वतीने सुनील वंजारी व वर्षा यादव यांनी केले. इम्रान शेख यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास ननावरे यांनी आभार मानले.