पुणे भाजपा शहराध्यक्षपदी माधुरी मिसाळ यांची वर्णी ; योगेश गोगावले प्रदेश उपाध्यक्षपदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 01:00 PM2019-08-19T13:00:24+5:302019-08-19T19:28:41+5:30

गेल्या काही वर्षांपासून योगेश गोगावले यांच्याकडे शहरअध्यक्षपदाची जबाबदारी होती.

Madhuri Misal to be BJP pune city president: official announcement left | पुणे भाजपा शहराध्यक्षपदी माधुरी मिसाळ यांची वर्णी ; योगेश गोगावले प्रदेश उपाध्यक्षपदी

पुणे भाजपा शहराध्यक्षपदी माधुरी मिसाळ यांची वर्णी ; योगेश गोगावले प्रदेश उपाध्यक्षपदी

Next

पुणे : पुणे: भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी आमदार माधुरी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. मावळते अध्यक्ष योगेश गोगावले यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आमदार मिसाळ मंगळवारी पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत. भाजपाच्या त्या पुण्यातील पहिल्याच महिला शहराध्यक्ष असतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीने ही नियुक्ती झाली असल्याची चर्चा भाजपा वर्तुळात आहे. गोगावले यांची मुदत मार्च २०१९ मध्येच पुर्ण झाली होती, मात्र त्यानंतर सातत्याने निवडणूका होत असल्याने त्यांच्याकडेच हे पद ठेवण्यात आले. आताही ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक असल्यामुळे गोगावले यांच्याकडेच पद कायम ठेवण्यात येईल असे बोलले जात होते. मात्र खासदार गिरीश बापट तसेच काही नगरसेवकांच्या मागणीमुळे त्यांना या पदावरून दूर करून आमदार मिसाळ यांच्याकडे कार्यभार दिल्याची चर्चा आहे. 
आमदार मिसाळ या सन २००७ मध्ये महापालिकेच्या नगरसेवक होत्या. त्यापुर्वी त्यांचे पती सतीश मिसाळ नगरसेवक होते. त्यांच्या निधनानंतर त्याच जागेवर झालेल्या निवडणूकीत त्या नगरसेवक म्हणून विजयी झाल्या. त्यानंतर लगेचच सन २००९ मध्ये त्यांना पर्वती विधानसभा मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिली. त्यात त्या विजयी झाल्या. पुढच्याच निवडणूकीत म्हणजे सन २०१४ मध्येही त्या आमदार झाल्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत त्यांच्याकडे जाहीरनामा समितीची जबाबदारी होती. तेव्हापासूनच त्या शहराध्यक्षपदाची इच्छुक होत्या. 
लोकसभा निवडणूकीनंतर लगेचच भाजपाकडून शहराध्यक्ष बदलणार याची चर्चा सुरू झाली. गोगावले यांनी लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती. तसेच बापट यांना वगळून ते सातत्याने पक्षाच्या पदाधिकाºयांच्या दिल्ली, मुंबई येथे भेटी घेत होते. त्यातून बापट गोगावले यांच्यावर नाराज झाल्याचे सांगण्यात येते. गोगावले यांना अचानक बदलून मिसाळ यांच्याकडे ही जबाबदारी देण्यामागे ही पार्श्वभूमी होती. 
गोगावले यांनी सांगितले की पक्षाचा हा निर्णय मान्य आहे. मुदत संपल्यानंतर पक्षाने आदेश दिल्यामुळेच कार्यरत होते. महापालिका, लोकसभा निवडणूकीत पक्षाची संघटन शक्ती दिसून आली. ती तयार करण्यामध्ये खारीचा वाटा देता आला याचा आनंद आहे. शहराध्यक्षपदावरून दूर होताना मनात कोणताही कटुता नाही, उलट महिला लोकप्रतिनिधीला ही संधी मिळाली याचा आनंदच आहे. मिसाळ यांचे अभिनंदन केले, त्या मुंबईतून पुण्यात येताच त्यांच्याबरोबर चर्चा करून पदाची सुत्रे देऊ.
मिसाळ म्हणाल्या, मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा हा निर्णय मान्य आहे. या पदावरून काम करण्याची इच्छा होती. तसे पक्षाला सांगितले होते हे खरे आहे, मात्र इतक्या लवकर ती संधी मिळेल अशी अपेक्षा नव्हती. गोगावले यांनी केलेले काम अधिक ताकदीने पुढे नेऊ.

Web Title: Madhuri Misal to be BJP pune city president: official announcement left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.