माधुरी मिसाळ यांना शिक्षा की मोकळीक? समर्थक अस्वस्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 06:00 AM2020-01-30T06:00:00+5:302020-01-30T06:00:08+5:30

विधानसभा निवडणुकीत दोन जागा गमावल्याची इतकी मोठी शिक्षा असणार नाही असे कार्यकर्त्यांना वाटते. मिसाळ यांच्या समर्थकांना पडलेला प्रश्न

Madhuri Misal removed from the city president bjp post ? | माधुरी मिसाळ यांना शिक्षा की मोकळीक? समर्थक अस्वस्थ

माधुरी मिसाळ यांना शिक्षा की मोकळीक? समर्थक अस्वस्थ

googlenewsNext
ठळक मुद्दे विधानसभा निवडणूकीत त्या स्वत: आमदार असतानाही त्यांच्याकडेच त्या पदाची जबाबदारी महिला शहराध्यक्ष म्हणूनही मिसाळ यांची एक वेगळी ओळख या सहा महिन्यात तयार

पुणे: फक्त सहा महिन्यांपूर्वीच दिलेले पद काढून घेतल्यामुळे आमदार माधुरी मिसाळ यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यातही विधानसभेला स्वत: आमदार असूनही पदाची जबाबदारी सांभाळूनही अचानक त्या पदावरून बाजूला व्हायला का सांगितले जावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. 
लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी तत्कालीन शहराध्यक्ष योगेश गोगावले यांना पक्षाने असेच अचानक त्या पदावरून बाजूला व्हायला सांगितले. त्यावेळी मिसाळ यांच्याकडे ते पद देण्यात आले. नंतर विधानसभा निवडणूकीत त्या स्वत: आमदार असतानाही त्यांच्याकडेच त्या पदाची जबाबदारी ठेवण्यात आली. आता राज्यात पक्षाची सत्ता नाही, त्यामुळे मिसाळ यांना मंत्रीपद वगैरे मिळण्याचीही शक्यता नाही, तरीही त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले आहे. 
विधानसभा निवडणुकीत दोन जागा गमावल्याची इतकी मोठी शिक्षा असणार नाही असे कार्यकर्त्यांना वाटते. मिसाळ विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून आल्या. त्यांच्याच मतदारसंघात भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. महिला म्हणून त्यांच्याशी बोलताना अन्य राजकीय पक्षाच्या नेत्यांना सावधपणे बोलावे लागते. कार्यकर्त्यांची एक मोठी फळी त्यांच्या मागे कायम उभी असते. आपल्या विधानसभा मतदारसंघात त्यांनी संघटना म्हणून उत्तम काम केले आहे. इतक्या अधिकच्या गोष्टी असतानाही पक्षाने असा निर्णय का घेतला अशी कुजबूज मिसाळ यांच्या समर्थकांमध्ये आहे.
महिला शहराध्यक्ष म्हणूनही मिसाळ यांची एक वेगळी ओळख या सहा महिन्यात तयार झाली होती. त्यांचा म्हणून एक वेगळा गट शहरात अस्तित्वात आहे. त्याला या पदामुळे बळ मिळू लागले होते. पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली होती. त्यांचे हे स्वतंत्र अस्तित्व व त्याला मिळणारी ताकद काहीजणांना शहरातील राजकीय वर्चस्वाला धक्का लावणारी वाटू लागली होती. त्यातूनच हा निर्णय झाला असल्याचेही पक्षात बोलले जात आहे.
..............
मिसााळ म्हणतात...
स्वत: माधुरी मिसाळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की मुळातच हे पद तीन महिन्यांसाठी म्हणजे तात्पुरते स्विकारले होते. निवडणूक तोंडावर असल्यामुळे पक्षश्रेष्ठींना त्यावर शहरातील कोणी पदाधिकारी व्यक्ती असावी असे वाटत होते. पक्षाने सांगितले म्हणून ते स्विकारले, त्यावर सहा महिने कामही केले, मात्र पक्षात अनेकजण काम करत असतात, त्यांनाही संधी हवी असते, त्यामुळे जाणीवपुर्वक पद सोडले असे मिसाळ यांनी सांगितले. पक्षाने पद सोडायला सांगितले यात काही तथ्य नाही असे त्या म्हणाल्या. ‘‘आमदार म्हणून मतदारसंघात बराच वेळ द्यावा लागतो. एखादे पद घेतले की त्यावर जबाबदारीने काम करावे लागते. तसे केले नाही तर अपराधी वाटते. दोन्ही पदांवर राहून काम करणे योग्य व शक्यही नव्हते. त्यामुळेच पद सोडले. पक्षाने घेतलेला निर्णय योग्यच आहे,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
  

Web Title: Madhuri Misal removed from the city president bjp post ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.