मोरगांवच्या मयुरेश्वराची माघी यात्रा रविवार पासून सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 07:52 PM2023-01-20T19:52:37+5:302023-01-20T19:53:13+5:30
सर्व धर्मियांना ‘श्रीं’ना जलस्नान घालण्याची पर्वणी
बारामती : अष्टविनायक आराध्य दैवत मोरगांव (ता.बारामती) येथील माघी यात्रा उत्सव रविवार दिनांक २२ पासून सुरू होत आहे. यात्रा उत्सवाच्या निमित्ताने दि २२ ते दि २६ पर्यंत निमित्ताने सर्व धर्मियांना श्रींस जलस्नान घालण्याची पर्वणी पहाटे पाच ते दुपारी १२ वाजेपर्यंत साधता येणार आहे. यंदा तिथीचा क्षय नसल्याने माघ प्रतिपदा ते माघ पंचमीपर्यंत सर्व धर्मियांना मयुरेश्वरास स्व:हस्ते जलस्नान घालता येणार आहे, अशी माहीती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.
सालाबादप्रमाणे येथील माघी यात्रा उत्सव रविवार सुरू होत आहे. या यात्रा उत्सवाची चिंचवड देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी उत्सवाची जय्यत तयारी केली आहे. उत्सवाच्या निमित्ताने सर्व धर्मियांना मयुरेश्वरास स्वहस्ते जलस्नान व अभिषेक घालण्याची पर्वणी साधता येणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे. उत्सवनिमित्ताने मंदिराच्या चार दिशांना असणारे धर्म ,अर्थ, काम ,मोक्ष या चार द्वार मंदिरापर्यंत अनवाणी चालत जाऊन दुर्वा, फुले वाहण्याची विशिष्ट अशी प्रथा आहे.
उत्सवा निमित्ताने श्रीमन् महासाधू मोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती पालखी सोहळा चिंचवडवरुन मोरगाव येथे दि. २४ सायंकाळी सात वाजता येणार आहे. या दरम्यान घरोघरी रांगोळीचे सडे व फटाक्यांची आतषबाजी करत मंगलमुर्ती पालखीचे स्वागत केले जाते. यात्रा उत्सव काळात श्रींची महापूजा, पदे, शेंदूरपाडा, श्रींचा विवाह, महाप्रसाद, छबिना आदी कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.