Pune Lok Sabha Result 2024: मुरलीधर मोहोळांचा एकतर्फी विजय; पुण्यात नेमकं काय घडलं? भाजपाने गड राखला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 10:00 AM2024-06-05T10:00:33+5:302024-06-05T10:01:14+5:30

विधानसभेच्या ६ मतदारसंघांपैकी कॅन्टोन्मेट वगळता कसबा, पर्वती, वडगाव शेरी, कोथरूड आणि शिवाजीनगर अशा ५ मतदारसंघात मोहोळ यांनी मताधिक्य मिळवले....

magic of kasba peth is lost in Pune! BJP retained its stronghold, Muralidhar Mohol's one-sided victory | Pune Lok Sabha Result 2024: मुरलीधर मोहोळांचा एकतर्फी विजय; पुण्यात नेमकं काय घडलं? भाजपाने गड राखला

Pune Lok Sabha Result 2024: मुरलीधर मोहोळांचा एकतर्फी विजय; पुण्यात नेमकं काय घडलं? भाजपाने गड राखला

पुणे : शहर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एकहाती बाजी मारली. त्यांना ५ लाख ८४ हजार ५८६ मते मिळाली. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील विजयाने चर्चेत आलेले आमदार रवींद्र धंगेकर त्यांचे प्रतिस्पर्धी होते. त्यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला, मात्र नेत्यांमधील गटबाजीने तो अयशस्वी ठरला. त्यांना ४ लाख ६१ हजार ४१९ मते मिळाली.

विधानसभेच्या ६ मतदारसंघांपैकी कॅन्टोन्मेट वगळता कसबा, पर्वती, वडगाव शेरी, कोथरूड आणि शिवाजीनगर अशा ५ मतदारसंघात मोहोळ यांनी मताधिक्य मिळवले. त्यांच्या हक्काच्या कोथरूड मतदारसंघातच त्यांना ७५ हजार मतांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवले. ते मोडणे धंगेकर यांना अवघड गेले.

लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेत मोहोळ यांनी सहज विजय मिळवला. भाजपचा पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील हा सलग तिसरा विजय आहे. यापूर्वी अनिल शिरोळे, गिरीश बापट व आता मोहोळ असे वेगवेगळे उमेदवार होते; मात्र भाजपला यावेळी मताधिक्य घटण्याचा धक्का बसला आहे.

सकाळी बरोबर ८ वाजता कोरेगाव पार्कमधील धान गोदामात मतमोजणीस सुरुवात झाली. महायुती व महाविकास आघाडी अशा दोघांचेही मतमोजणी कार्यकर्ते उत्साहात मतमोजणी केंद्रात जमा झाले. पहिल्या फेरीपासूनच मोहोळ यांनी आघाडी घेतली, ती अखेरपर्यंत कायम होती. तरीही सुरुवातीच्या ५ फेऱ्या झाल्यावरही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पुढच्या फेऱ्यांमध्ये आम्ही त्यांचे मताधिक्य मोडून काढू, असे सांगत होते. मात्र ते शक्य झाले नाही. प्रत्येक फेरीत त्यांचे मताधिक्य वाढतच गेले. अखेरच्या फेरीदरम्यान त्यांचे मताधिक्य १ लाख ८४ हजार १६७ झाले. तेवढ्या मतांनी त्यांनी विजय मिळवला.

मतांची आघाडी ५० हजार झाली त्यावेळीच काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्र सोडण्यास सुरुवात केली. त्याचवेळी भाजप व महायुतीचे पदाधिकारी मात्र केंद्रातच घोषणा देऊ लागले. मतदारसंघाचे समन्वयक राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच भाजपचे सर्व नगरसेवक केंद्रात आले. साडेचार वाजता विजयी उमेदवार मोहोळ मतमोजणी केंद्राच्या बाहेर आले. कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यांवर बसवून केंद्रात आणले. यावेळी गुलाल उधळण्यात आला. काय म्हणता पुणेकर, निवडून आले मुरलीधर, अशा घोषणा देण्यात येत होत्या.

लाेकसभा निवडणुकीतील विजय माझ्याबरोबरच महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. प्रचारादरम्यान माझ्यावर वैयक्तिक आरोप झाले. मी त्याला प्रत्युत्तर दिले नाही. माझ्या पक्षाची शिकवण तशी नाही. प्रचारात आपण काय काम केले, आपल्या पक्षाने काय काम केले ते सांगावे, असे माझे मत आहे. त्याप्रमाणे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या कामांविषयी बोलत होतो. पुण्याच्या विकासासाठीच मी माझ्या खासदारकीचा उपयोग करणार आहे.

- मुरलीधर मोहोळ, खासदार

Web Title: magic of kasba peth is lost in Pune! BJP retained its stronghold, Muralidhar Mohol's one-sided victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.